सावधान! बी केअरफुल! भाग 2

0 comments
Reading Time: 8 minutes

आपणा सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा! प्रजासत्ताक भारत चिरायू होवो! एकोणीसशे सत्तेचाळीसला भारत स्वतंत्र झाला आणि एकोणीसशे पन्नासला भारताची राज्यघटना अस्तित्वात आली. सध्याच्या भाषेत सांगायचं तर भारताचं मॅन्युअल तयार झालं ज्याद्वारे ही देश नावाची गोष्ट कशी चालणार किंवा चालवायची ह्याची सर्व माहिती व त्यासंबंधातलं ज्ञान त्या घटनेच्या त्यावेळच्या तीनशे पंच्याण्णव आर्टिकल्समध्ये दिलं गेलं. थोडक्यात देश कसा चालवायचा त्याची पध्दत तयार केली गेली, खर्याअर्थाने लोकशाही आली. आपल्या बहुरंगी, बहुढंगी, बहुधर्मी, बहुभाषी देशाला एका घटनेने बांधणे ही किती कठीण आणि महाप्रचंड गोष्ट असेल ह्याची कल्पनाही आपण करू शकणार नाही, त्यामुळेच राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या सात सदस्यांच्या ड्राफ्टिंग कमिटीचे आपण सारे भारतीय आजन्म ऋणी राहू.
भारताची राज्यघटना किंवा भारतीय संविधान किंवा कॉन्स्टिट्युशन ऑफ इंडिया जशी आपल्या देशासाठी आहे तशीच ती प्रत्येक राज्य, समाज, संघटना, संस्था, घर आणि अ‍ॅक्चुअली एका व्यक्तीसाठी पण तयार करायची असते.ज्या देशात आपण राहतो त्या देशातल्या राज्यघटनेशी निगडीत आपल्याला आपल्या पध्दती बनवाव्या लागतात. देशाचा नियम एक आणि आपला वेगळा असं होऊ शकत नाही, आणि झालंच तर तिथे तणाव उत्पन्न होऊ शकतो. असो, ह्या विषयाची व्याप्ती मोठी आहे आणि आजचा माझा तो विषय नाही. पण आम्हीही जेव्हा वीणा वर्ल्डसारखी एक मध्यम आकाराची किंवा छोटीच म्हणूया अजून अशी संस्था सुरू केली तेव्हा तिथेही ही संस्था कशी वाटचाल करणार? ह्यातील वेगवेगळ्या डिव्हिजन्स त्यांचं वेगळेपण जपत पण मुख्य संस्थेच्या मुल्यांशी फारकत न घेता हार्मनीमध्ये कसं काम करणार? भारतीय नियम आणि नीतिमूल्यांशी आपण समन्वय कसा साधणार? जागतिक स्पर्धेत आपली संस्कृती आणि परंपरांचं जतन कसं करणार? अशा अनेक गोष्टींचा विचार करून आमच्या संस्थेचं मॅन्युअल बनवलं. त्यानंतर आलं ते आम्ही ज्या ट्रॅव्हल ह्या व्यवसायात आहोत तिथे एखादी सहल कशा तर्हेने सुनियोजितरित्या आयोजित करायची ह्याच्याही पध्दती बनविल्या. देशातले जास्तीत-जास्त पर्यटक जेव्हा वीणा वर्ल्डच्या ग्रुप टूर्सच्या माध्यमातून जातात तेव्हा सहली आधीची, सहली नंतरची तसेच सहली वरची कार्यप्रणाली कशी असणार ह्याचंही एक लिखित-अलिखित किंवा प्रोसेस ओरिएन्टेड मॅन्युअल आहे जेणेकरून त्याच्याशी संलग्न असलेली वीणा वर्ल्ड टीम, आमचे देशविदेशातले असोसिएट्स, एअरलाईन्स ह्यांचा एकूणच ऑर्केस्ट्रॉ व्यवस्थित सुरात वाजतो, अन्यथा एका वेळी जगाच्या कानाकोपर्यात फिरणार्या सहा ते आठ हजार पर्यटकांना अपेक्षित सर्व्हिस देणं अवघड गेलं असतं.
जेव्हा अपेक्षा काय आहेत किंवा काय ठेवायच्या हे एकमेकांना माहीत असतं तेव्हा सिस्टिम व्यवस्थित चालते. आमचं आणि पर्यटकांचं नातं हे तेवढच पारदर्शक आहे. आम्ही काय देणार हे सर्वत्र स्पष्टपणे लिहिलेलं असतं त्यामुळे अमूक एका सहलीतून काय-काय अपेक्षा करायची ह्याचीही जाणीव पर्यटकांना असते. हे आम्हाला माहितच नव्हतं ही कमेंट पर्यटकांकडून कधीही ऐकायला मिळणार नाही ह्यासाठी टीम मेहनत घेत असते. ह्या आमच्या सेवाक्षेत्रात सर्वत्र माणसंच माणसं असल्याने कधी एखादी चूक घडतेही पण किती फास्ट आपण ती चूक दुरुस्त करतो आणि पुन्हा ती चूक होणार नाही ह्यासाठी खबरदारी घेतो हे महत्त्वाचं. टूर मॅनेजरच्या दिमतीत प्रत्येक सहल यशस्वी होते ह्यातलं पारदर्शकता हे एक महत्त्वाचं कारण आहे असं मला वाटतं. आणि त्यामुळेच टीमशी आणि असोसिएट्सशी सतत संवाद, चर्चा, सुधारणा ह्या गोष्टी नित्यनेमाने सुरू असतात.
आणखी एक गोष्ट वीणा वर्ल्डमध्ये युनिक आहे ती म्हणजे पर्यटकांशी आणि वाचकांशी थेट संवाद. माझा ईमेल आयडी अनेक वृत्तपत्रात येणार्या ह्या लेखमालेत दिलेला असतो जेणेकरून एकमेकांमधला संवाद जिवंत राहिल. ह्या लेखमालेत असो किंवा सहलीवर एखादी गोष्ट खटकली तर वाचक आणि पर्यटक दोघंही ईमेलद्वारे ते कळवतात, आणि मी किंवा आमची टीम लागलीच त्यावर शक्य ते सोल्युशन काढते किंवा बदल करते. जेव्हा संस्था सुरू केली तेव्हाच ठरवलं होतं की वीणा वर्ल्ड ही एक जबाबदारी आहे आणि त्यासाठी आपली मॅनेजमेंट ही पर्यटकांसाठी सतत अ‍ॅक्सेसिबल असली पाहिजे. शक्यतोवर चूका होणार नाहीत अशीच आपली व्यवस्था असली पाहिजे आणि जर काही अडचण आलीच तर ती लागलीच सोडवली गेली पाहिजे आणि आपल्याला त्यासंबंधात सर्व जानकारी असायला पाहिजे. भले त्या अडचणीवर काम टीमच करणार असते कारण तेही तेवढेच सक्षम आहेत हे मला अभिमानाने इथे म्हणावसं वाटतं.
एकूणच थेट संवाद महत्वाचा, आणि त्यासाठी कधी नव्हे एवढ्या सुविधा तंत्रज्ञानाने निर्माण केल्या आहेत. जेव्हा आम्ही देशविदेशात सहली आयोजित करतो तेव्हा अनेक अनपेक्षित घडामोडींना सामोरं जावं लागतं. आमच्या अखत्यारित असेल तर आम्ही त्यावर लागलीच तोडगा काढतो पण कधीकधी नाईलाज असतो आणि त्याचा भुर्दंड कधी पर्यटकांना, कधी आम्हाला, कधी आमच्या असोसिएटला किंवा कधी एअरलाईनला भरावा लागतो. त्यातील बहुतेक सर्वच किस्से मी ह्या लेखमालेद्वारे इथे नमूद करीत असते जेणेकरून देशविदेशात कुठे-कुठे, काय-काय खबरदारी घ्यायची ह्याची माहिती सर्वांना मिळते, मग ते पर्यटक वीणा वर्ल्डसोबत जाणारे असोत, कोणत्याही इतर पर्यटनसंस्थेतर्फे जाणारे असोत किंवा वैयक्तिकरित्या, कस्टमाईज्ड वा टेलरमेड हॉलिडे पॅकेज घेऊन जाणारे असोत, सर्वांना फायदा होतोच. तसेच काही सावधानीचे किस्से इथे देत आहे. हे देताना कुणाचाही नामोल्लेख करणं मी मुद्दाम टाळलंय. एखाद्या अनुभवातून आपण शिकणं महत्त्वाचं, आणि तोच हेतू आहे. मुंबई एअरपोर्टवर वीणा वर्ल्ड रीप्रेझेंटेटिव्ह मंडळी सहलीला जाणार्या पर्यटकांना फ्लॅग पोलजवळ भेटतात आणि त्यांची डॉक्युमेंट्स हॅन्डओव्हर करतात. मुंबई हे जगाशी अनेक एअरलाईन्सद्वारे कनेक्टेड असल्याने जास्तीत जास्त सहली ह्या मुंबईहून सुरू होऊन मुंबईत संपणं हे क्रमप्राप्त होतं आणि त्यामुळे पर्यटकांना मुंबईहून निघावं लागतं. दररोज किमान पाच आणि सीझनमध्ये कमाल शंभर सहली वीणा वर्ल्डतर्फे ह्या मुंबई एअरपोर्टवरून प्रस्थान करीत असतात आणि महिन्या-दोन महिन्यातून एखादीतरी घटना घडतेच घडते कितीही प्रीकॉशन घेतली तरी. युरोप अमेरिकेच्या सहलींना जाणार्या पर्यटकांचे पासपोटर्स हे व्हिसा झाल्यावर पर्यटकांच्या घरी येतात कुरियरद्वारे किंवा त्यांना स्वत: जाऊन ते कलेक्ट करावे लागतात. त्यामुळे ह्या आणि ऑन-अरायव्हल व्हिसावाल्या पर्यटकांनी सहलीच्या प्रस्थानदिनी घरून निघताना पासपोर्ट सोबत घेतले आहेत की नाही ह्याची शहानिशा करण्यासाठी आम्ही ईमेल, एसएमएस, व्हॉटस् अ‍ॅप, फोन, टूर मॅनेजर ह्या सगळ्याचा आधार घेत पर्यटकांना आठवण करून देत असतो. आणि त्यामुळेच दररोज शेकडो पर्यटक विनासायास सहलीला वा प्रवासाला निघतात. आता मागच्या आठवड्यातली गोष्ट, दोन दिवसांच्या अंतराने पासपोर्टच्या बाबतीत घडलेली. एक पर्यटक दुबईला निघाले होते. मुंबई एअरपोर्टवर आमच्या रीप्रेझेंटेटिव्हला भेटले. त्यांच्याकडून स्नॅक पॅकेट घेतलं आणि आत चेकइन काऊंटरवर गेले, पासपोर्ट ऑफिशियलकडे दिला तेव्हा लक्षात आलं की हा पासपोर्ट व्हॅलिड पासपोर्ट नाही तर तो जुना पासपोर्ट आहे. चुकून आमच्या पर्यटकांकडून जुना पासपोर्ट आणला गेला होता. असं घडू शकतं. माझ्याही बाबतीत घडलंय. मुंबईतच राहत असल्याने मी त्यावेळी पटकन पासपोर्ट आणू शकले. पण तेव्हापासून मी जुने पासपोटर्स बासनात बांधून सहसा हाताशी लागणार नाहीत अशा ठिकाणी ठेवून दिले आहेत. लागलीच एअरपोर्टवरून असं असं घडलंय ही माहिती आम्हा सर्व संबंधितांना कळली. एकच अडचण होती ती म्हणजे पर्यटक मुंबईबाहेरचे होते आणि विमानाच्या वेळेपर्यंत पासपोर्ट येणं अशक्य होतं. सर्वांना हळहळ वाटत होती पण नाईलाज होता. तुम्ही पासपोर्ट घेऊन या, उद्या आपण तुम्हाला ह्याच सहलीला पाठवू असा दिलासा देऊन पर्यटकांना घरी पाठवलं. त्यांनी तीच सहल चोवीस तासाने जॉईन केली दुबईमध्ये. जसे ते आमच्या टूर मॅनेजरला भेटले सर्वांनी आनंदाने नि:श्वास सोडला. त्याचवेळी माझ्या ईमेल बॉक्समध्ये ह्या पर्यटकांच्या जावयांचा ईमेल धडकला. आशय होता जे घडलं त्याला नाईलाज होता पण ज्या तर्हेने वीणा वर्ल्ड टीमने सहकार्य केलं ते वाखाणण्यासारखं आहे आणि त्यासाठी धन्यवाद! आमच्या जीआर टीम, एअर टीम व टूर मॅनेजरविषयी असे कौतुगोद्गार ऐकून मला मुठभर मांस चढलं. सीनियर्स स्पेशलची टूर होती त्यामुळे गाला इव्हिनिंगला मीही ह्या पर्यटकांना भेटले तिथे. दुबई बघू शकल्याचा आनंद त्यांच्या चेहर्यावर होता पण मला आतून नवीन तिकीटासाठी त्यांना भुर्दंड सहन करावा लागला ह्याची खंत होती. तिथून मी टीमला मेसेज पाठवला, भले अगदी एखाद्याच्याच बाबतीत असं घडलं तरी आपल्याला अजून काय करता येईल हे पॉईंट वन पर्सेंटही घडू नये म्हणून.
दुसरा किस्सा एका सहा जणांच्या कुटुंबाचा. उत्साहात मंडळी मुंबई एअरपोर्टला पोहोचली आणि लक्षात आलं की पासपोटर्स अहमदनगरला घरीच राहिले आहेत. जास्त खबरदारी म्हणून त्यांनी सर्वांचे पासपोटर्स एकत्र कुटुंबप्रमुखाकडे दिले आणि कसं कोणास ठाऊक ते शोल्डर बॅगेत भरायचेच राहिले. इथेही दुसर्या दिवशी हे संपूर्ण कुटुंब सहलीला जॉईन झालं पण नाहक मन:स्ताप आणि आर्थिक नुकसान. शक्यतोवर पासपोर्ट आणि तिकीट ही ज्याने-त्याने सांभाळायची आणि एकमेकांंना पासपोर्ट सोबत आहेत ह्याची आठवण करून द्यायची हे तंत्र अवलंबायचं. (क्रमश…)

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*