युनिफॉर्म

0 comments
Reading Time: 9 minutes

रीपब्लिक डे परेड बघणं म्हणजे डोळ्यांना, कानांना आणि मनाला एक मेजवानी असते. युनिटी, युनिफॉर्मिटी, हार्मनी, सिन्क्रोनायझेशन प्रिसिजन, कोऑर्डिनेशन ह्या सगळ्याचा एकत्रित असा मेळ बघून धन्य व्हायला होतं. आपल्या देशाप्रती असलेला आपला आदर ह्या परेडमुळे निश्‍चितपणे वाढतो. आर्मी-नेव्ही-एअरफोर्सचे फ्लोट्स वा प्रदर्शनं बघताना आपल्या रोमारोमात एक आगळी ऊर्जा निर्माण झाल्याचं आपल्याला दिसतं. शौर्यपदकं स्विकारणारे आपले जवान वा त्यांच्या कुटुंबियांना बघताना देशप्रेम तर जागृत होतंच पण त्याचसोबत स्वत:पुरतं आयुष्य जगणार्‍या आपल्या खुजेपणाचीही जाणीव होते.

सव्वीस जानेवारीची रीपब्लिक डे परेड प्रत्येक भारतीयाने बघितलीच पाहिजे. खरंतर ज्यावेळी ही भव्य-दिव्य परेड दिल्लीला सुरू असते त्यावेळी आपण सर्वजण कुणी शाळेत, कुणी सोसायटीत, कुणी क्लबमध्ये तर कुणी कंपनीत झेंडावंदन करण्यात मग्न असतो. म्हणजे कदाचित काही सीनियर मोस्ट सिटिझन्स सोडले तर सर्वजण ज्यावेळी आवर्जून टिव्हीसमोर बसायला पाहिजेत तेव्हा घरातच नसतात. सव्वीस जानेवारी मला आपल्या भारतातला सर्वात मोठा सण वाटतो. दिवाळीच्या पहाटेसारखं सर्वांनी लवकर उठून तयारी करून रीपब्लिक डे परेडचा एक आगळा सोहळा बघायला टिव्हीसमोर असलं पाहिजे. नंतर कधीतरी बघू हे कधी होतंच नाही. प्लॅनिंग-ऑर्गनायझिंग-अ‍ॅक्युरसी-कॉन्सनट्रेशन ह्या सगळ्याची ती एक पाठशाळा असते जणू. आपल्या देशातल्या आपल्यासारख्याच सर्वसामान्य माणसांनी त्यांच्या-त्यांच्या कामगिरीत आणलेलं असामान्यत्व आपल्याला भारावून टाकतंच पण ते एक इस्टंट टे्रनिंगही असतं. एखादा फ्लोट बघताना, डोळ्यांनी त्याचं कौतूक करताना आपण त्यांच्या प्लॅनिंग-सिलेेक्शन-रीहर्सल-डी डे ह्या सगळ्याचा अंदाज घेऊ शकतो, त्यातून बर्‍याच गोष्टी जाणू शकतो. आता बघानं कोणतीही गोष्ट करताना ज्या कॉन्सनट्रेशनची-कोऑर्डिनेशनची-अ‍ॅक्युरसीची गरज असते ती आपण इथून घेऊ शकतो. हल्ली आपला प्रत्येकाचा दिवस हा नवनव्या अडथळ्यांची शर्यत असतो. वातावरणातच इतका कोलाहल भरलेला असतो की कोणत्याही गोष्टीवर एकचित्त होण्याकरिता एक वेगळी शक्ती निर्माण करावी लागते. अशावेळी ही परेड आठवावी, त्यातल्या टीम्सचं कॉन्सनट्रेशन डोळ्यांसमोर आणावं आणि आपणही सभोवताल विसरून फक्त हातातल्या एकाच गोष्टीवर एकचित्त व्हावं. मी स्वत: हा प्रयोग माझ्यावर करून पाहिलाय. इट वर्क्स. लेट्स ट्राय इट आऊट व्हेनेव्हर वूई फिल देअर इज टू मच नॉईज इन द सराऊंडिंग.

आणखी एक गोष्ट त्या परेडमधली आवर्जून बघण्यासारखी असते ती म्हणजे वेगवेगळ्या राज्यांचे वा दलांचे अप टू डेट युनिफॉर्मस्. कडक इस्त्री ह्या शब्दाचा खरा अर्थ कळतो आपल्या सैन्यदलांच्या युनिफॉर्मकडे बघून, आणि इथला हा युनिफॉर्म नुसता युनिफॉर्म नसतो तर ते एक अ‍ॅस्पीरेशन आणि इन्स्पिरेशनही असतं. प्रत्येक भारतीय त्याच्या वा तिच्या आयुष्यात कधीतरी एकदातरी हा युनिफॉर्म अंगावर चढविण्यासाठी आस बाळगून असतो. आज त्र्याहत्तर वर्ष झाली स्वातंत्र्य मिळून पण अजूनही ह्या युनिफॉर्मविषयीचा आदर तसूभरही कमी झाला नाही. आठवून बघा, आपण रेल्वे स्टेशनवर किंवा विमानतळावर कंटाळलेल्या अवस्थेत वाट बघत बसलोय आणि तेवढ्यात काही जवान कवायत करीत किंवा आपल्यासारखेच प्रवासी बनून पण त्यांच्या युनिफॉर्ममध्ये आपल्या समोरून जाताहेत. आपण बसल्याजागी आपल्याला जरा नीट बसवतो, कधी-कधी उठून उभे राहतो, संधी आलीच तर त्यांना शेकहँड करतो, काही नाही तर मनातल्या मनात त्यांना त्यांच्या सेल्फलेस नि:स्वार्थी देशसेवेसाठी थँक्यू व्हेरी मच म्हणतो. त्याक्षणी आपण आपलं व्यवहारी वास्तव विसरतो. तो युनिफॉर्म त्यावेळी आपल्याला बरंच काही सांगून जातो. लेह लडाखला दरवर्षी किमान तीन वेळा मी जाते. तिथे जाताना युनिफॉर्ममधल्या अशा अनेक जवानांना मनोभावे सलाम करण्याची सुसंधी मिळते आणि एखाद्या तीर्थक्षेत्राच्या भेटीपेक्षाही जास्त समाधान ही प्रत्येक लेह लडाखची वारी मिळवून देते.

सहा वर्षांपूर्वी जेव्हा वीणा वर्ल्डची सुरुवात झाली तेव्हा आमच्याकडे युनिफॉर्म हवा की नको? हा एकदम हॉट टॉपिक होता. जहाल, मवाळ आणि फायनान्स. हे तिन्ही विचारवंत गट होते. ह्यांचंही बरोबर, त्यांचंही बरोबर, तुमचंही बरोबर ह्या त्रिशंकू अवस्थेत आम्ही डोक्याला हात धरून बसलो होतो. फायनान्स टीमचं म्हणणं, संस्था नव्याने सुरू करताय, हातात पैसे नाहीत, टीमसाठी युनिफॉर्म आणायचा असेल तर तो आपल्याला म्हणजे संस्थेला द्यायला पाहिजे, इतर अनेक महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्यासाठी पैशांची उभारणी करायचीय. युनिफॉर्म असला काय किंवा नसला काय त्याने काही अडणारेय का? आणि आणायचाच असेल तर नंतर आणा, जरा पैसे कमवायला लागल्यावर. आत्ता मात्र जमेल तिथे पैसे वाचवा. पैशाचं सोंग आणता येणार नाही हे लक्षात ठेवा आणि म्हणूनच आम्ही आत्ता युनिफॉर्म नको ह्या मतावर ठाम आहोत. जहाल गट म्हणजे जास्त करून यंगस्टर्स मंडळी होती त्यांनी त्यांचे मुद्दे मांडले, युनिफॉर्म घालायला ही काय शाळा आहे? इट्स नॉट डन यार! आम्ही युनिफॉर्म शाळेतच जेमतेम घातला. लहान होतो तेव्हा आम्हाला काही कळत नव्हतं म्हणून आणि नंतर शाळेची शिस्त म्हणून. बंडाचा झेंडा फडकवता येत नव्हता म्हणून आम्ही युनिफॉर्म घालत होतो. आता तुम्हीच सांगा आवडीने तुमच्यापैकीही किती जण युनिफॉर्म घालत होतात शाळेत असताना? मोस्ट ऑफ अस हेटेड युनिफॉर्म. आपल्यातली एकता महत्त्वाची. यस् फॉर युनिटी! ऑफकोर्स, पण त्यासाठी एकसारखेपणाचा हट्ट कशाला? युनिफॉर्मिटी इज शीअर बोअरडम! विविधता हे आपल्या भारतातल्या प्रत्येक प्रांताचं वैशिष्ट्य आहे. आपल्यातला प्रत्येक जण वेगवेगळा आहे. प्रत्येकाचे विचार वेगवेगळे आहेत, ते तसे असण्याचं स्वातंत्र्य आपल्या प्रत्येकाला आहे आणि ती संस्कृती आपली आहे हे आम्ही जाणतो आणि तेच घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. पण त्यासाठी बाह्य देखावा म्हणजे युनिफॉर्म असण्याची आवश्यकता नाही. लेट इच वन वेअर व्हॉट ही ऑर शी वॉन्ट्स! अमेरिका सर्वांच्या पुढे आहे हे तर मान्य आहे आपल्याला, ती प्रोग्रेसिव्ह कंट्री आहे हे ही त्यांनी दाखवून दिलंय, ती अमेरिका म्हणजे USA काय म्हणते माहितीय? युनिफॉर्मिटी इज नॉट द की टू सक्सेस अ‍ॅन्ड ग्रोथ! शाळांनी आधीच आम्हाला एकसारखं विचार करायला शिकवून आणि युनिफॉर्ममुळे एकसारखे दिसून बरंच नुकसान केलंय. ते दिवस संपले आता. इथे आम्हाला प्रत्येकाला वेगळा विचार करायचाय, वेगळं दिसायचंय. वूई आर ग्रोन अप, वूई आर अगेन्स्ट युनिफॉर्म, या जहाल मतवाद्यांनी बोलती बंद केली होती. आता मवाळ धोरणवाले कसा मुद्दा मांडणार हा प्रश्‍न होता कारण त्यांच्या विरोधात पैसेवाले नव्हे पैसे नसणारे आणि जहाल असे दोन भक्कम विरोधक होते. त्यांनी बोलायला सुरुवात केली, आपल्याकडे पैसे नाहीत ही गोष्ट मान्य आहे आणि आपण प्रत्येकजण स्वतंत्र विचाराचे स्वतंत्र भारताचे आधुनिक नागरिक आहोत, आपल्याला सगळ्याच बाबतीत सर्व प्रकारचं स्वातंत्र्य आहे हे ही तेवढंच खरं आहे. युनिफॉर्म का नको ह्या विषयीचे तुमचे विचार रास्त आहेत आणि ते पटतातही पण तरीही युनिफॉर्म असायला हवा हा आमचा आग्रह आहे आणि त्याची कारणं पुढीलप्रमाणे आहेत. एक-आपण सेवा क्षेत्रात म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये आहोत, जिथे बर्‍याच ठिकाणी युनिफॉर्म असतो. देशाची सेवा करणारे आपले प्रत्येक दलातील जवान पाहिले तर आपल्याला युनिफॉर्मचं महत्त्व कळेल. जवान नि:स्वार्थीपणे भारतीयांची देशसेवा करतात, आपण व्यावहारिक दृष्टीने पण मनापासून आपल्या पर्यटकांची सेवा करतो. तेव्हा या क्षेत्रात आपलाही युनिफॉर्म असावा असं आम्हाला वाटतं. दोन-पर्यटकांना वेगवेगळे देश दाखवणं आणि त्यासाठी त्यांच्या दिमतीला आपल्या टूर मॅनेजरने असणं हे आपलं सगळ्यांचं मिळून एक महत्त्वाचं काम. हा टूर मॅनेजर जर युनिफॉर्ममध्ये नसेल तर पर्यटकांनी त्याला ओळखायचं कसं? गर्दीत शोधायचं कसं? म्हणजेच टूर मॅनेजरला एक ब्राइट कलरवाला युनिफॉर्म असणं महत्त्वाचंच नव्हे तर अपरिहार्य आहे. म्हणजेच टूर मॅनेजर युनिफॉर्म इज अ मस्ट! तीन-जर टूर मॅनेजरला युनिफॉर्म अपरिहार्य असेल तर मग त्याच्या खांद्याला खांदा लावून त्याच्या पाठीशी सतत असणारी टीम युनिफॉर्ममध्ये नसणं हा भेदभाव झाला, शीअर डीस्क्रीमिनेशन! लेट्स ग्रो टुगेदरचा नारा घेऊन जन्माला आलेल्या वीणा वर्ल्डला ते चालेल का? चार-युनिफॉर्म घातला म्हणजे सर्वांनी एकसारखाच विचार करायचाय असं थोडंच आहे. अनेक वेगवेगळ्या विचारांची-त्यांच्या त्यांच्या कामात एक्सपर्ट असलेली अशी आपण सगळी मंडळी एकत्र आलोयत काहीतरी चांगलं करायला, त्यामुळे प्रत्येकातला वेगळेपणा हीच आपली स्ट्रेंन्थ आहे जी जपायचीय-वाढवायचीय त्यात आपण सगळे युनिफॉर्ममध्ये एकसारखे दिसलो म्हणून काय झालं? पाच-आपल्या संस्थेकडे आता जसे पैसे नाहीत तसेच आपल्या अनेकांकडे तरी कुठे खोर्‍याने पैसे आहेत रोज वेगवेगळे फॅशनचे कपडे घालायला? ज्यांना झेपेल ते अप टू डेट येतील, ज्यांना नाही त्यांनी काय करायचं? इतरांचे छान छान कपडे बघून आपल्या परिस्थितीला मनोमन दोष देत कथित होत राहायचं? सहा-मोठ्या हिमतीने, शुन्यातून आपण काहीतरी निर्माण करायला निघालोय, त्यासाठी आपण आपली संस्कृती, नितीनियम, मूल्य ठरवली आहेत त्या सर्वांना जोडणारी एक समान गोष्ट आपल्या सर्वांना हवीय आणि ती आहे एका साध्या टी शर्टच्या स्वरुपात, ज्याला युनिफॉर्म असं म्हणतात, हा एक समान धागा असणार आहे आपल्या सर्वांना ध्येयपूर्तीच्या आपल्या वाटचालीत एकत्र ठेवणारा, ऑन अवर टोज् ठेवणारा, राईट ट्रॅकवर ठेवणारा, आपल्या नितीमूल्यांची आठवण करून देणारा. सात-सध्याच्या फॅशनच्या युगात युनिफॉर्म कुणाला आऊटडेटेड थॉट वाटेल. पण आपण असं काम करायचंय की हा युनिफॉर्म आज साधा वाटला तरी पुढे तो प्राइसलेस बनून जाईल. ज्या क्षेत्रात आपण आहोत त्याठिकाणी तो उठून दिसेल आणि पर्यटकांना तो हवाहवासा वाटेल. मवाळंानी शांतपणे एक एक मुद्दा मांडून सर्वांची मनं जिंकून बाजी मारली आणि वीणा वर्ल्डचा येलो टीशर्ट जन्माला आला.

 

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*