Marathi

युएसए-वन्स इज नेव्हर ईनफ!

Reading Time: 5 minutes

जेव्हा आपण पुन्हा-पुन्हा एखाद्या देशाला भेट देतो तेव्हा त्याच्या छुप्या पैलूंचं आपल्याला दर्शन घडून काही वेगळे आविष्कार आपण पाहू शकतो. आणि मग स्थलदर्शन, मॉन्युमेंट्स बरोबरच त्या देशाच्या छुप्या पैलूंचे अनुभव आपल्या हॉलिडेचा महत्त्वाचा भाग ठरतात. पन्नास स्टेट्स, एक फेडरेल डिस्ट्रिक्ट, पाच महत्त्वाच्या टेरिटरीज् व अनेक छोट्या बेटांनी मिळून बनलेल्या विशाल अमेरिकेमध्ये असा अनुभव घ्यायचा, तर मग एकच हॉलिडे पुरणार तो कसा?

सकाळपासून कामाला लागले तेव्हा दुपारपर्यंत घरातल्या वीसपेक्षा अधिक छोट्या-मोठ्या घड्याळांमधील टाईम चेंज करण्यात वेळ कसा गेला हे कळलंच नाही. अमेरिकेतल्या ईस्ट कोस्ट वरच्या बॉस्टन शहरात राहणार्‍या माझ्या मैत्रिणीचं हे बोलणं ऐकून मला गम्मत वाटली. डे लाइट सेव्हिंग टाईम लागू होत असल्याने हिवाळा आला की अमेरिकेत एक तासाने घड्याळ मागे केले जाते व मार्चमधील ठरलेल्या रविवारी एका तासाने घड्याळ पुढे केले जाते. सूर्यप्रकाशाचा उत्तम उपयोग करून घेता यावा म्हणून डे लाइट सेव्हिंग टाईम वापरला जातो. आणि बरोबरच आहे नं! ईस्ट-वेस्ट असा पसरलेला अमेरिका देश खर्‍याअर्थाने भव्य-दिव्य आहे, त्यामुळेच तर इथे डे लाइट सेव्हिंगची गरज भासते. असो. पण ह्यामुळे रविवारी एक तास अधिक झोपायला मिळालं यातच माझी अमेरिकन मैत्रिण खूश होती. खरंच पन्नास स्टेट्स, एक फेडरेल डिस्ट्रिक्ट, पाच महत्त्वाच्या टेरिटरीज् व अनेक छोट्या बेटांनी मिळून बनलेल्या ह्या विशाल अमेरिकेमध्ये एकच हॉलिडे पुरणार तो कसा? त्यात  युएसएच्या व्हिसाची वैधता काही महिन्यांची नसून चक्क दहा वर्षांची असल्याने मेट्रो सिटीज्, नॅचरल वंडर्स, पर्वतरांगा आणि देखण्या समुद्र किनार्‍यांनी नटलेल्या या देशाला वारंवार भेट देण्यासाठी आपल्याला एक गुरूकिल्लीच मिळते असं म्हणायला हरकत नाही.  युएसएची पहिली भेट ही बहुदा त्या देशाची आर्थिक राजधानी न्यूयॉर्क (द बिग अ‍ॅपल) व वॉशिंग्टन डी सी या त्याच्या राजधानीपासून होते. सोबत अद्भुत नायगरा फॉल्स,थीम पार्कस्ने भरलेले ओरलँडो, एंटरटेन्मेंट कॅपिटल लास वेगास, हॉलीवूडचे माहेरघर लॉस एंजेलिस आणि सॉफ्टवेअर इंडस्ट्रीचे घर असलेलं सॅन फ्रान्सिस्कोही पर्यटकांच्या लिस्टमध्ये अग्रस्थानी असतात. त्याचबरोबर आजकाल शिकागो शहरातले अनोखे आर्किटेक्चरसुद्धा सर्वांना आकर्षित करते. पण जेव्हा आपण पुन्हा पुन्हा एखाद्या देशाला भेट देतो तेव्हा त्याच्या छुप्या पैलूंचं आपल्याला दर्शन घडतं व काही वेगळे आविष्कार आपण पाहू शकतो. स्थलदर्शन, मॉन्युमेंट्स बरोबरच असे आपल्या अनुभवास येणारे एखाद्या देशाचे छुपे पैलू  आपल्या हॉलिडेचा मग महत्त्वाचा भाग ठरतात.

आज या लेखात अमेरिकेची सुरुवात करूया कॅलिफोर्नियापासून. अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया राज्याचा समुद्रकिनारा जगप्रसिद्ध आहे आणि हिवाळ्यातही इथलं हवामान फारच सौम्य व आनंददायी असतं. त्यातच जगभरात अनेक ठिकाणी वाईन्स बनत असल्या तरी सर्वात उत्कृष्ट वाईन्स बनतात त्या कॅलिफोर्निया राज्यात. इतकं सगळं छान जुळून येतं म्हणूनच तर पर्यटकांसोबतच खुद्द अमेरिकेतल्या इतर भागातले अमेरिकन्सही हिवाळ्यातील बोचर्‍या थंडीपासून सुटका करून घेण्यासाठी कॅलिफोर्नियात हॉलिडे घेणं पसंत करतात आणि हिवाळ्यातही कॅलिफोर्निया उत्तम हॉलिडे डेस्टिनेशन ठरतं. कॅलिफोर्निया हे अमेरिकेचे सनशाईन स्टेट म्हणून ओळखले जाते. निसर्गाचे वरदान लाभलेलं हे राज्य आपल्या सुंदर बीचेस, भरपूर प्रमाणात येणारी फळं, पिकणार्‍या भाज्या, आकर्षक रीसॉर्ट टाऊन्स व उत्तम जेवणासाठी प्रसिद्ध आहे. कॅलिफोर्निया हॉलिडेचा खरा आनंद लुटायला इथे थेट एक गाडी घेऊन ड्राईव्ह करणे हे सगळ्यात उत्तम ठरते. त्यात पॅसिफिक कोस्ट हायवे हा जगातील सर्वात निसर्गरम्य ड्र्राईव्ह म्हणून ओळखला जातो. कॅलिफोर्नियाच्या उत्तरेकडच्या बॉर्डरवरच्या ओरेगॉन राज्यापासून ते खाली सॅन डिएगोपर्यंत कुठेही न थांबता आरामात ड्राईव्ह केल्यास या ड्राईव्हला पूर्ण करण्यास दहा तास लागतात. या मार्गावरच्या अतिशय सुंदर समुद्रकिनार्‍याला लागून अनेक छोटी गावं, मानवी जगापासनं सुरक्षित राहिलेलं जंगल व वाईन बनविणार्‍या अनेक वायनरिज् दिसतात. अशा ठिकाणी थांबत कॅलिफोर्नियन लाईफस्टाईलची झलक आपण अनुभवू शकतो.  कॅलिफोर्नियाच्या सुंदर कोस्टलाईनवरील अनेक बीच रीसॉर्ट्समध्ये आपण सर्फिंग, सॅन्डबोर्डिंग, पॅरासेलिंग, यॉटिंग, कयाकिंग सारख्या अनेक वॉटरस्पोर्टस्चा आनंद घेऊ शकता. त्याचबरोबर इथल्या रीसॉर्ट टाऊन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सिटी टूर्स, वर्ल्ड क्लास रेस्टॉरंट्स व शॉपिंगची मजासुद्धा लुटू शकता. कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिस शहरात एका ओपन टॉप बसमधून हॉलीवूडच्या अनेक स्टार्सची घरे बघण्याची टूर मला फार आवडली. तसेच सान्ता बार्बरा या स्पॅनिश हिस्ट्रीचा वारसा लाभलेल्या रीसॉर्ट टाऊनच्या प्रोमेनाडवर तिथल्या लोकल मार्केट्सचे स्टॉल्स बघता बघता फेरफटका मारायला छान वाटले. सान्ता बार्बरामध्ये मी एक गमतीशीर टूर केली. ती म्हणजे इट अ‍ॅन्ड शूट टूर. ही एक फूड टूर होती ज्यात तिथल्या अनेक रेस्टॉरन्ट्समध्ये भेट देऊन तिथल्या खास पदार्थांचे टेस्टिंग करता येते व या खाद्यपदार्थांचे उत्तम फोटो कसे काढायचे हे सुद्धा शिकवले जाते. हल्लीच्या इन्स्टाग्राम जनरेशनला अशा टूर्स नक्कीच आवडतील.

लॉस एंजेलिसच्या डाऊनटाऊनच्या पश्‍चिमेला सान्ता मोनिका हे कोस्टल शहर पॅसिफिक महासागराच्या किनारी वसलेलं आहे. सांता मोनिका बीच व पीअर वर पॅसिफिक पार्क, अम्युझमेन्ट पार्क, ऐतिहासिक लूफ, हिप्पोड्रोम कॅरुसेस् व सांता मोनिका अ‍ॅक्वेरियम एकाच ठिकाणी बघायला मिळतात. फिटनेस प्रेमी मंडळी या बीचेसवर व्यायाम, जॉगिंग व बीच एक्सरसाईज करताना दिसतात. त्यासाठी पिअर शेजारी १९३० मध्ये मसल् बीच हे ओपन-एअर जिमसुद्धा बांधण्यात आले होते. सांता मोनिका पिअर हे अमेरिकेच्या प्रसिद्ध रूट ६६ चा शेवटचा टप्पा आहे. अमेरिकेचे आठ राज्य आणि तीन टाईम झोन पार करत शिकागो शहरात सुरू होणारा रूट ६६ हा २४४ मैलांचा रस्ता १९२६ साली लोकांंसाठी उघडला होता. हा रस्ता अमेरिकेतला एक महत्त्वपूर्ण हायवे म्हणूनही ओळखला जातो. या रूटवर अनेक अनोख्या गोष्टी बघायला मिळतात जसे अमारिओ, टेक्सासमधले कॅडिलॅक रॅच. हे कॅडिलॅक गाड्यांचे एक ऑफ बीट आर्ट इन्स्टॉलेशन आहे. जमिनीत अनेक कॅडिलॅक्स् रोवलेल्या दिसतात. या विलक्षण आर्ट इन्स्टॉलेशनला भेट देणार असाल तर स्वतःबरोबर एक पेंटचा स्प्रे कॅन नक्की घेऊन जा. इथे भेट देणार्‍या पर्यटकांना या गाड्या आपल्या मर्जीने ग्रॅफिटीने रंगवण्यासाठी प्रोत्साहित केले जाते. रूट ६६ ची सुरुवात होते ती शिकागो शहरापासून. इलिनॉय राज्यातील लेक मिशिगनच्या काठावरचे शिकागो हे अमेरिकेतील एक मोठे व महत्त्वाचे शहर आहे. आपल्या बोल्ड आर्किटेक्चरसाठी प्रसिद्ध असलेल्या या शहराची टूर आपण पायी, ट्रॉली बसने किंवा सर्वात उत्तम म्हणजे रिव्हर बोटने करू शकता. उंच-उंच गगनाला भिडणार्‍या स्काय स्क्रेपर्ससाठी प्रसिद्ध असलेल्या शिकागो शहरातले जॉन हॅनकॉक सेंटर, १४५१ फूट उंच विलिस टॉवर व आपल्या अनेक म्युझियम्स्साठी सुद्धा प्रसिद्ध आहे. ह्यातलंच दखल घेण्यासारखं म्युझियम म्हणजे शिकागो इन्स्टिटयुट ऑफ आर्ट. मात्र शिकागो शहरात आर्ट हे  म्युझियममध्ये बंद नसून शहरात सभोवतीच सर्वांसाठी खुल्यावर उपलब्ध आहे. आणि गम्मत म्हणजे ह्याचं थोडंबहुत नातं भारतासोबतही आहे. भारतात जन्मलेल्या ब्रिटिश आर्टिस्ट सर अनीष कपूर यांचे प्रसिद्ध क्लाउड गेट किंवा द बीन हे एक मेटल स्कल्पचर शिकागोच्या मिलेनियम पार्कमध्ये उभे आहे. शिकागो शहराची प्रसिद्ध स्कायलाईन व सभोवतीच्या हिरवळीचे प्रतिबिंब या बीनच्या आकाराच्या स्कल्पचरमध्ये फारच सुंदर दिसते. इथे नेहमीच पर्यटक वेगवेगळ्या पोसेसमध्ये स्वतःचे फोटो काढतानासुद्धा दिसतात. शिकागोची आणखीन एक खासियत म्हणजे इथला डीप-डिश पिझ्झा. भरपूर भाज्या, टोमॅटो सॉस-चीजने भरलेल्या ह्या पिझ्झाचा एक स्लाईस म्हणजे संपूर्ण जेवणच ठरते.

खाण्यावरून आठवले, तुम्हाला जर अंतराळात अ‍ॅस्ट्रोनॉट काय खात असतील याची उत्सुकता असेल तर ओरलँडोच्या पूर्वेस साधारण एका तासावर असलेल्या केनेडी स्पेस सेंटर ला भेट द्या. येथील शटल लाँचवर स्वतः शटल लाँचचा थरारक अनुभव घ्या. अंतराळावरून दिसणारे पृथ्वीचे विलक्षण दृष्य आयमॅक्सच्या मोठ्या पडद्यावर पाहण्याचा आनंद घ्या. एका खर्‍याखुर्‍या अ‍ॅस्ट्रोनॉटला भेटण्याची संधीही इथे मिळू शकते बरं का. लहान मुलांसाठी तर केनेडी स्पेस सेंटरमध्ये खास प्रोग्राम्ससुद्धा आहेतच. लहानांसाठी जवळपासच्या ओरलँडोमध्ये इतके अम्युझमेंट पार्क आहेत की इथे फॅमिली हॉलिडे घेताना युनिव्हर्सल किंवा डिस्नेच्या थीम पार्कस्मधील अनेक हॉटेल्समध्ये राहून आपण हॉलिडेचा आनंद द्विगुणीत करू शकता. मुलांना खरेखुरे निसर्गाचे प्लेग्राउंड दाखवायचे असेल तर जवळपासच्या द एव्हरग्लेड्स या फ्लोरिडाच्या सॉग्रास प्रेरीस, मँग्रोव्हस् व इस्टुअरीसच्या जगात घेऊन जा. इथल्या  ग्रासलँड्समध्ये एअरबोट टूर्सवर क्रोकोडाईल्स्चा शोध घेत अ‍ॅलिगेटर्स, स्पूनबिल्स, ग्रेट एग्रीट्ससारख्या पशु-पक्ष्यांच्या अनोख्या दुनियेची ओळख होते.

अमेरिका जरी आपल्याला तिच्या अनेक मॉडर्न शहरांसाठी माहिती असली तरी या देशाला निसर्गाचं वरदान भरभरून  लाभलेलं आहे. पांढर्‍या-शुभ्र वाळूचे बीचेस्, हिरव्यागार पर्वतरांगा, बर्फाच्छादित डोंगरशिखरे, अनेक विशाल लेक्स, १२००-१८०० वर्षांपासून उभे असलेले गगनचुंबी रेडवूड झाडं व या सर्वांचे रक्षण करण्यासाठी बनविलेले अनेक नॅशनल पार्कस्… इथले  अनेक नॅशनल पार्कस् ड्रायव्हिंग, हायकिंग, हॉलिडेज्साठीही उपलब्ध आहेत. केवळ अमेरिकेतलंच नव्हे तर जगातलेही पहिले नॅशनल पार्क आहे येलोस्टोन नॅशनल पार्क, इथे तर भेट द्यायलाच हवी. तर एका अनोख्या हॉलिडेसाठी अमेरिकेच्या पश्‍चिमेकडच्या हवाई आयलंडची निवड करा. डोंगरमाथ्यावरून वितळलेला लावा समुद्रात आदळताना पाहण्याचा विलक्षण अनुभव घेता येतो तो हवाईत. इथल्या व्होल्कॅनिक क्रेटरभोवती ड्राईव्ह करा किंवा हेलिकॉप्टरमधून एरीयल व्ह्यू बघा, आणि ट्रॉपिकल रेनफॉरेस्ट, कॉफी प्लान्टेशन्सबरोबरच पांढर्‍याशुभ्र आणि चक्क काळ्या वाळूच्या बीचेसवर निळ्याशार आरसपानी पाण्यात डुंबून घ्या. जॅझ म्युझिकचे जन्मस्थान न्यू ऑरलीयन्सपासून नॅशवील, मेमफिस यासारख्या ठिकाणी अमेरिकेच्या म्युझिकल जर्नीमध्ये सहभागी व्हा किंवा ख्रिसमस-न्यू ईयरच्या सेलिब्रेशनसाठी न्यूयॉर्कला चला आणि झगमगणारं न्यूयॉर्क पहा. हिवाळ्यात ह्या शहराची जादू काही औरच.

सर्व प्रकारच्या अनुभवांनी परिपूर्ण अशा अमेरिकेत वर्षातून केव्हाही आणि अगदी दरवर्षीही भेट द्यायचे ठरवले तरी दरवेळी नवनवीन अनुभव नक्कीच घेता येतील. चला, अमेरिका सज्ज आहे आपल्या स्वागतासाठी, तुम्ही निघताय नं?

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

*