ड्रेस कोड

0 comments
Reading Time: 8 minutes

आपण कुणाला भेटतो तेव्हा एकही शब्द बोलण्याआधी, त्या व्यक्तीने काय पोशाख केला आहे ह्यावरून त्या व्यक्तीची ओळख आपल्याला होते. बाई आहे का पुरुष इथपासून त्या व्यक्तीचा धर्म, जात, समाजातील त्याचा हुद्दा, पत, व्यवसाय, अगदी नॅशनॅलिटीसारख्या अनेक गोष्टींचा अंदाज बांधणे

हे केवळ एखाद्याच्या पोशाखावरून सहज शक्य आहे. आपले कपडे हे नॉन व्हर्बल कम्युनिकेशनचा महत्त्वाचा भाग ठरतात, म्हणूनच ड्रेस कोड द्यायची सुरुवात झाली असावी बहुधा!

स्वित्झर्लंड टूरिझमच्या वार्षिक इंडिया बिझनेस मिशनचे इनव्हिटेशन कार्ड माझ्या हातात होते. मी ते वाचले आणि परत-परत डोळे चोळून पाहू लागले. कारण मला वाटलं की, मी काही चुकीचे वाचतेय किंवा माझा काही गैरसमज तर होत नाहीय नं. बिझनेस मीटिंग सेशनचा डे्रस कोड चक्क ‘बीच कॅज्युअल’ असं त्यात लिहीलं होतं. एरव्ही अतिशय फॉर्मल ड्रेस कोडमध्ये वावरणार्‍या युरोपीयन लोकांचा हा ड्रेस कोड बघून विश्‍वास बसत नव्हता. ‘कामाबद्दल अतिशय गांभीर्य बाळगणार्‍या आणि प्रत्येक गोष्टीत परफेक्शन साधणार्‍या ह्या स्विस मंडळींना नक्की झालंय तरी काय’, असा विचार मनात आला. नेहमीचे फॉर्मल कपडे घालण्याचा ह्यांना कंटाळा आला की काय असे वाटले. मग त्यापुढे मीटिंग व्हेन्युकडे लक्ष गेले. ह्या मीटिंग्ज् गोव्याच्या मॅरियट हॉटेलमध्ये होणार होत्या व त्या आटोपल्यानंतर बीचवर दुपारच्या जेवणाचेसुद्धा आमंत्रण होते. खरंतर, स्वित्झर्लंडच्या बर्फाच्छादित पर्वतरांगा आणि गोव्याचा समुद्रकिनारा ह्या दोन्हीकडच्या तापमानात, हवेत बराच फरक होता पण तरीही गरजेप्रमाणे बदलण्याचा हा स्विस अंदाज मनाला भावून गेला.

बिझनेसच्या जगतात आणि खासकरून बिझनेस टूरिझमच्या जगात ‘ड्रेस कोड’ला फार महत्त्व असते. बर्‍याच वेळा एखाद्या पार्टीला किंवा सोहळ्याला आपल्याला आमंत्रण मिळते, तेव्हा ‘नक्की काय घालावे?’ हा प्रश्‍न पडतो. मग त्यापुढे त्या इनव्हिटेशन कार्डवर ड्रेस कोड छापला असला की आपण अजून गोंधळात पडतो. काही वेळा या ड्रेस कोडचा अर्थ तरी काय, या ड्रेस कोडची गरज तरी काय? असे प्रश्‍नही समोर उभे राहतात. फॉर्मल, बिझनेस कॅज्युअल, स्मार्ट कॅज्युअल, लाऊंज सूट अशा अनेक प्रकारच्या ड्रेस कोडचा नक्की अर्थ कसा लावावा, हा एक महत्त्वाचा कर्मकठीण विषय. बर्‍याचदा असे ड्रेस कोड एखाद्या इव्हेन्टसाठी स्पष्टपणे जाहीर केले जातात तर बर्‍याचदा हे गृहित धरलेले असतात. बिझनेसच्या जगातच नव्हे तर रेस्टॉरंट, क्लबज्, स्थलदर्शनाच्या जागा, गुरुद्वारा, मंदिरं तसंच मॉस्कपासून स्विमिंग पूलसारख्या अनेक ठिकाणी हे ड्रेस कोड लागू पडतात. कुठल्याही सोशल गॅदरिंगमध्ये समानता असावी, त्या जागेसाठी, वातावरणासाठी आणि प्रसंगासाठी सर्व मंडळींचे कपडे योग्य ठरावेत यासाठी डे्रस कोड गरजेचा असतो. थोडक्यात त्या प्रसंगाचा माहोल बनविण्याचे काम आपला ड्रेस कोड करतो, असे म्हणायला हरकत नाही. आपला पोशाख आपल्याबद्दल बरंच काही सांगून जातो. पुरुषांनी पँट आणि स्त्रियांनी स्कर्ट, साडी इ. कपडे घालावेत तर भारतात टिकली, गंध, सिंदूर हे स्त्रियांनी वापरावे हे सगळे एक प्रकारचे समाजाने ठरवून दिलेले ड्रेस कोडच आहेत नाही का!

सर्वांमध्ये समानता असावी याच भावनेतून शाळेच्या ‘युनिफॉर्म’ संकल्पनेचाही जन्म झाला. शिवाय युनिफॉर्म घातला की, ‘आज काय घालू यामध्ये वेळ न घालवता पटकन तयार होता येते व दिवसातला मौल्यवान वेळ वाचतो, नाही का?’ आता बघा नं, स्थलदर्शनाच्या ठिकाणी कितीही गर्दी असली तरी ‘पिवळ्या रंगाचा’ टी शर्ट घातलेल्या वीणा वर्ल्डच्या टूर मॅनेजरला बघून आपण निश्‍चिंत होतोच नं. युनिफॉर्ममुळे ओळखसुद्धा पटकन होते व लक्षात राहते ह्याचं हे जवळचं उत्तम उदाहरण.

स्वित्झर्लंंडच्या माऊंट टिटलीसवर काम करणार्‍यांचा युनिफॉर्म स्कि जॅकेट व स्कि पॅन्टस् असेल तर थायलंडमधले गाईड हे बहुधा टी-शर्ट मध्येच दिसतात. सर्वात गम्मत तर मला ऑस्ट्रेलियामध्ये फिरताना वाटते, जिथे बर्‍याच वेळा ड्रायव्हर व गाईड शॉर्टस्बरोबर टाय बांधून येतात. अनेक माईस टूर्सच्या मीटिंग्ज् व कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या इनसेंटिव्ह टूर्सवर जेव्हा दोनशे-तीनशे टीम मेंबर्स युनिफॉर्ममध्ये दिसतात तेव्हा त्या कंपनीच्या लोकांचे बॉन्डिंग नक्कीच वाढत असावे. या माईस टूर्सवर तर प्रत्येक प्रोग्रामला वेगळा ड्रेस कोड असतो आणि कधी-कधी एका दिवसातच दोन-तीन वेळासुद्धा ड्रेस कोड चेंज करावे लागतात. सकाळच्या कॉन्फरन्स किंवा मीटिंगसाठी फॉर्मल ड्रेस कोड, स्थलदर्शनाच्या टूर्ससाठी कॅज्युल ड्रेस कोड तर संध्याकाळच्या गाला डिनर्ससाठी अनेकदा वेगवेगळ्या थीम्स्वर आधारित थीम पार्टीज् किंवा कॉसच्युम पार्टीज्सुद्धा असतात. मग ती कधी बीच पार्टी असते जेव्हा फुलांच्या डिझाईनचे शर्ट व ड्रेसेसबरोबर गळ्यात फुलांच्या माळा घातल्या जातात. स्वित्झर्लंडच्या शिलथॉर्न या जेम्स बॉन्डच्या सिनेमामुळे प्रसिद्ध झालेल्या माऊंटन टॉपवर सर्वात लोकप्रिय जेम्स बॉन्ड थीम पार्टीज्मध्ये टक्सीडो आणि बो-टाय बांधून तिथल्या रीव्हॉलविंग रेस्टॉरंटमध्ये बसल्यावर प्रत्येक टीम मेंबर जेम्स बॉन्ड एवढाच स्टायलिश वाटतो.

‘टक्सीडो जॅकेट व ब्लॅक टाय’ हे आज अगदी फॉर्मल ड्रेस कोड समजले जाते. कुठल्या पार्टीचा ड्रेस कोड जेव्हा ‘ब्लॅक टाय’ असा सांगितला जातो, तेव्हा पुरुषांनी पांढर्‍या स्टार्च शर्टवर डार्क ब्ल्यु किंवा काळे जॅकेट व बो सारखा बांधलेला काळ्या रंगाचा टाय घालणे अपेक्षित आहे. स्त्रियांनी लाँग गाऊन्स् किंवा भारतीय ड्रेसमधील सलवार कमीज किंवा साडी असा पेहराव केला तरी चालते. आज जरी या ‘ब्लॅक टाय’ला सर्वात फॉर्मल ड्रेस कोडचा दर्जा मिळाला असला तरी एके काळी हाच ब्लॅक टाय कॅज्युअल समजला जायचा. कारण यापेक्षाही फॉर्मल ड्रेस म्हणजे-व्हाईट टाय, पांढरा कडक स्टार्च शर्ट, ज्यावर वेस्ट कोट व त्यावर लांब टेल कोट, जो पुढून छोटा व मागून लांब असतो आणि वेगळी पांढरी कॉलर शर्टाला जोडली जायची. हा ड्रेस कोड पूर्ण करण्यासाठी पांढर्‍या रंगाचा बो-टाय बांधला जायचा. स्त्रियांनी फ्लोर लेंथ गाऊन्स्बरोबर पांढरे ग्लोवस् व डोक्यावर मुकुटासारखे तियारा व इतर दागिने घालणे अपेक्षित असायचे. ‘व्हाईट टाय’ आजकाल केवळ रॉयल घराण्यात स्टेट फंक्शन्स्, नोबल प्राईस सोहळा इ. वेळाच परिधान केलेला बघायला मिळतो. साधारण विसाव्या शतकाच्या सुरुवातीला पहिल्या महायुद्धानंतर हा व्हाईट टाय गायब होऊन ब्लॅक टायने याची जागा घेतली.

बदलत्या काळानुरूप फॉर्मल ड्रेसकोडचा अर्थच बदलतोय. सर्वात फॉर्मल ड्रेस कोड म्हणजे व्हाईट टाय समजला जातो, ह्या व्हाईट टायची जागा काळानुरूप ब्लॅक टायने घेतली, तसंच ब्लॅक टायची जागा आता स्मार्ट कॅज्युअल्स हळूहळू घेतायत. अमेरिकन बिझनेस मॅन, अ‍ॅपल कम्प्युटर्सचा सर्वेसवा स्टीव्ह जॉबनं खर्‍या अर्थान सुटा-बुटामधल्या बिझनेसमनला कूल लूक दिला, तो जीन्स आणि स्वेट शर्टचा पेहराव करून. पेहरावापेक्षा कर्तृत्व महत्त्वाचं हे स्टीव्ह जॉबनी आपल्या कामातून दाखवून दिलं, म्हणून आता बहुधा बरेच बिझनेस पर्सन अशाच स्मार्ट कॅज्युअल लूकमध्ये दिसले तर त्याचे नवल नको.  कुठलाही ड्रेस कोड असला तरी स्त्रियांना मात्र मनासारखे कपडे घालण्यासाठी बरीच मोकळीक व स्वातंत्र्य मिळते. पुरुषांपेक्षा आपल्या कपडे-दागिन्यांकडे जास्त लक्ष देणे व तयारी करताना जास्त वेळ लावणे असे टक्के-टोमणे स्त्रियांना सारखे ऐकावे लागत असताना, ड्रेस कोडच्याबाबतीत नेहमी पुरुषांसाठीच जास्त डीटेल्स का असावेत? असा मला कायम प्रश्‍न पडतो. पण ह्याचा एक समजून घेण्यासारखा अर्थ असाही होऊ शकतो, तो म्हणजे, ‘स्त्रियांना कुठल्याही समारंभासाठी योग्य पेहराव करण्याचं ज्ञान उपजतच आहे व पुरुषांना मात्र हे सांगितल्याशिवाय कळत नाही’.

ड्रेस कोड नेहमीच जास्त कपडे घालण्यासाठी नव्हे तर कधी-कधी कमी कपडे घालण्यासाठीसुद्धा अमलात आणतात. हॉटेलच्या स्विमिंग पूल्समध्ये ‘Undress code’ लागू पडतो आणि पोहण्यास योग्य स्विमिंग कॉसच्युम सर्वांनी घालावा ही अट असते. इथे साड्या व ड्रेसवर बॅन आहे. अनेकदा ड्रेस कोड हा परंपरेला जपण्यासाठी पूर्वाकाळ चालत आलेल्या रीती-रिवाजाला धरून ठेवतो. आजसुद्धा भारतात-भारताबाहेर अनेक ब्रिटिश व कोलोनियल क्लबमध्ये फॉर्मल शूज व जॅकेटशिवाय एन्ट्री नसते. जसं आजही आपल्याकडील अनेक मंदिरांमध्ये म्हणजे उदाहरणच द्यायचं झालं तर, गुरुवायुर मंदिरात केवळ लुंगी व साडीसारखा पोशाख परिधान करणं आवश्यक आहे, पॅन्ट-शूज चालत नाहीत अगदी तसंच. एका ठिकाणी जे चालते ते दुसरीकडे वर्ज्य आहे. दुबई-अबुधाबी टूरवर निघताना तिथल्या मॉस्कला भेट देताना लांब हाताचे कपडे व डोक्यावर बांधायला स्कार्फ नक्कीच न्यावा. सिंगापूर व इतर ठिकाणी क्रुझवर कसिनोमध्येसुद्धा थोडे फॉर्मल असणे कधीही उत्तम ठरते. काही नाईट क्लब किंवा डिस्कोमध्ये तर तुम्ही छान कपडे घालून त्या जागेची शोभा वाढवत असाल तरच एन्ट्री मिळते, बरं का!

फॅशनच्या जगात तर आज हे सर्व नियम तोडण्याची स्टाईल आहे. पण जगाचा आविष्कार पाहण्यासाठी आपण ज्या जागेला भेट देतो त्या जागेचा आदर करत, संयम बाळगून आपण तो ड्रेस कोड पाळला तर आपलाच प्रवास चांगला होऊ शकतो. स्थलदर्शन असो किंवा एखादा सोहळा असो किंवा पार्टी असो, ‘हा असाच ड्रेस कोड का?’ म्हणण्याऐवजी जर आपण लक्षपूर्वक तयार होऊन, त्यातून आनंद मिळवत जर तयार झालो, तर त्या पार्टीची शान अधिक वाढेल. आफ्टर ऑल व्हेन इन रोम, ़डू अ‍ॅज द रोमन्स डू!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*