जस्ट वन मोअर डे!

0 comments
Reading Time: 9 minutes

प्लीज, प्लीज, प्लीज मम्मा! आपण इथे अजून एक दिवस नाही का राहू शकत? जस्ट वन मोअर डे. आपण रीटर्न फ्लाईट बदलून टाकू ना. प्लीज गं!  हॉटेल चेक आऊटच्यावेळी साराचा गोड हट्ट वजा विनवण्या सुरू झाल्या. पुढे दररोज मला हे ऐकावे लागेल हे मला तेव्हा ठाऊक नव्हते, पण दरवेळी हॉटेलमधून चेक-आऊट करताना हाच ड्रामा होत असे. आपले हॉलिडे डेस्टिनेशन सोडून परत घरी जावेसे वाटत नसले तर आपला हॉलिडे पूर्णपणे यशस्वी झाला असे म्हणायला हरकत नाही. ह्याचे मला अर्थातच फार बरे वाटले कारण हा माझा सारा बरोबरचा मदर-डॉटर बॉन्डिंग हॉलिडे होता आणि अगदी शेवटच्या क्षणी ठरला होता. पण त्याहून आनंदाची गोष्ट होती की सोळा वर्षाच्या साराला चक्क श्रीलंका हे हॉलिडे डेस्टिनेशन म्हणून पसंत पडले होते. गंमत म्हणजे मी हॉलिडेसाठी श्रीलंकेची निवड केली आहे हे ऐकून माझ्या सोशल सर्कलमधला प्रत्येक जण  But Why Sri Lanka?. तुझी टीनेजर मुलगी कंटाळणार नाही का? श्रीलंका तर केरळ सारखच दिसत नं?  भारताबाहेर जाऊन एखाद्या फॉरिन कंट्रीला भेट दिली असा  फील येणार नाही श्रीलंकेत… असे अनेक शंका निर्माण करणारे प्रश्‍न करीत होता.

हॉलिडेवर जाताना अनेकांचा व्हाय श्रीलंका हा प्रश्‍न सोबत घेऊन आम्ही गेलो होतो, पण  श्रीलंकेवरून परत येताना माझ्या टीनेजर मुलीकडून जस्ट वन मोअर डे मम्मा! हे ऐकताना माझा आनंद गगनात मावेनासा झाला,कारण अनेकांच्या व्हाय श्रीलंका प्रश्‍नाचं चोख उत्तर सोबत घेऊन आम्ही हॉलिडेवरून परतलो होतो. खरंतर कुठलाही हॉलिडे घेताना आपल्याला सर्वप्रथम ठरवायला हवं की, आपण ह्या हॉलिडेवर का जातोय?  व्हॉट इज द पर्पज ऑफ ट्रॅव्हल? कारण यावरूनच ठरणार आहे की आपण एखाद्या डेस्टिनेशनमध्ये नक्की काय बघणार आहोत व कुठले अनुभव घेणार आहोत. उदाहरण द्यायचं झालं तर श्रीलंकेचंच घेऊया. जर श्रीलंकेतली सर्वात महत्त्वाची ठिकाणे बघत संपूर्ण लंकेला भेट द्यायची असेल तर कमीत कमी दहा दिवस तरी हातात असावेत. श्रीलंकेतील सर्वात लोकप्रिय ठिकाणी भेट द्यायची असेल तर आठवड्याभरात कॅन्डी व नुआरा एलियाला भेट देता येते. श्रीलंकेच्या टूरिझम सर्किटमधलं कल्चरल ट्रँगल म्हणजे देशाच्या बरोबर मध्यभागी वसलेली प्राचीन राजधानी अनुराधापुरा, पोलोनारुवाचे प्राचीन शहर, सिग्रिया, दाम्बुल्ला व कॅन्डी असे अनेक वर्ल्ड कल्चरल हेरिटेज साईट्स. अर्थातच या सर्व जागांना न्याय द्यायला चार-पाच दिवस काही पुरणार नाहीत आणि सिग्रिया रॉक फोट्रेस या पाचव्या शतकातल्या प्राचीन किल्ल्यामध्ये बांधलेल्या शहरासोबतच इथल्या इतर महत्त्वाच्या आकर्षणांना भेट द्यायलाच हवी. पौराणिक कथांमध्ये तर भारताचे आणि श्रीलंकेचे जवळचे नाते आहे आणि इथे रामायणाच्या कथेतल्या महत्त्वाच्या ठिकाणांना भेट देणारी रामायण ट्रेल्स अशी टूर सुद्धा करता येते. श्रीलंकेच्या याला नॅशनल पार्क व गल ओया नॅशनल पार्कस्मध्ये जंगल सफारी सुद्धा शक्य आहे आणि या सफारीवर जंगलातील बर्ड लाईफसोबतच हत्ती, स्लोथ् बिअर आणि लेपर्डस् बघण्याचा थरारक अनुभव आपण घेऊ शकतो. श्रीलंका बेट असल्याने या देशाच्या चारही दिशांना उत्कृष्ट समुद्रकिनारा लाभलेला आहे. इथे अनेक सर्फिंग क्लासेस घेता येतात व ब्लू व्हेल या भव्यदिव्य व्हेल माशाची सफारी करत व्हेल वॉचिंग क्रुझ सुद्धा करता येते. हे आयलंड नेशन सुंदर बीचेस् सोबतच फॉरेस्ट, बुश, टी-गार्डन्स, 2500 मीटरच्या उंचीचे पर्वत व जंगलाचे विशाल क्षेत्र आहे.  संपूर्ण जगात श्रीलंकेच्या जंगलांमध्ये मोठ्या संख्येने  बिबटे आढळतात, तर इथे पाच हजारहून अधिक जंगली हत्ती सुद्धा आहेत.

वर्ष संपण्याआधी एक रिलॅक्सिंग ब्रेक घेऊन नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज होऊ या, ह्या विचाराने आम्ही हॉलिडेवर निघालो. इथली सर्व ठिकाणे तर आपल्याला नक्कीच बघता येणार नाहीत. मग वेळेच्या अभावामुळे केवळ पाच रात्री, सहा दिवस जे शक्य होईल ते बघण्याचा निर्णय घेत आम्ही आधी आमच्या हॉलिडेचं ध्येय दोघींनी मिळवून ठरवलं. आणि मग वेलनेस, फन अ‍ॅण्ड फूड अशा तिहेरी इच्छा पूर्ण करण्यासाठी आम्ही श्रीलंकेला निघालो. शाळेत शिकविलेल्या इतिहास-भुगोल या विषयांपलिकडे साराचे श्रीलंकेशी फारसे नाते नव्हते मग ही तरूण पीढीतली मुलगी इतक्या पटकन श्रीलंकेला होकार कशी काय देत आहे ह्याचे मला कुतूहल वाटले. अर्थात नवीन पीढीच्या नवीन तर्‍हा, आणि त्या लवकरच मला उलगडल्या. आपल्याला तिथे हॉपर्स नक्की मिळतील नं? मागच्या वेळी आपण लंडनला भेट दिली होती तेव्हा तिथल्या हॉपर्स नावाच्याच श्रीलंकन रेस्टॉरंटमध्ये आपण बरेच हॉपर्स खाल्ले होते. श्रीलंकन फूड इज अमेझिंग-आपण नक्कीच श्रीलंकेला भेट देऊ या. भारताच्या बदलत्या टूरिस्टची झलक मला आमच्या घरातच प्रत्यक्ष पहायला मिळाली आणि आपल्या हॉलिडेज्मध्ये केवळ साईटसिईंग आकर्षणे न आखता तरूण पीढीचा विचार करायचा असेल तर एंटरटेन्मेंट आणि फूडला सुद्धा महत्त्व द्यायला हवे हे लक्षात आले.

भारतासारखेच श्रीलंकेच्या हॉलिडेवर एअरपोर्टपासून आपल्या दिमतीला आपली प्रायव्हेट गाडी आणि ड्रायव्हर हजर असतात. कोलोंबोच्या बंदरनाईके इंटरनॅशनल एअरपोर्टवर उतरताच संजय ह्या आमच्या ड्रायव्हर कम गाईडने आमचे स्वागत केले. कोलोंबोहून आम्ही निघालो ते आमच्या पहिल्या डेस्टिनेशनला जे कॅन्डीवरून एका तासावर होते. सनतानी वेलनेस रीसॉर्ट अ‍ॅण्ड स्पा हे श्रीलंकेतलं हीडन जेम म्हणावं लागेल. नकल्स पर्वतरांगांच्या कुशित वसलेलं हे एक छोटंसं हॉलिडे रीसॉर्ट आहे. विकम नावागामुवागे या रीसॉर्टच्या मालकाशी भेट झाली तेव्हा हा रीसॉर्ट बांधण्यामागची कल्पना लक्षात आली. आजकालच्या आयुष्यातल्या ताणतणावांवर मात करण्यासाठी शरीर, मन आणि आत्म्याचे संतुलन ठेवणे गरजेचे आहे या विचारावर आधारित सनतानी रीसॉर्टची स्थापना झाली. मिनिमल लक्झरी या कॉनसेप्टवर बांधलेल्या या रीसॉर्टमध्ये केवळ 20 रूम्स आहेत. एखाद्या हॉटेलच्या लॉबीसारखी इथे लॉबी नसून एका खुल्या बाकावर आमचे गरमागरम फेस टॉवेल व आयुर्वेदिक ड्रिंकने स्वागत झाले.

कॅन्डीपासून 32 कि.मी वर अरटेना या टी-इस्टेटवरील हिरव्यागार 48 एकरात व्हेरापितीया या खेड्यात हे लक्झरी रीसॉर्ट वसलेले आहे. हिरव्यागर्द रेनफॉरेस्ट व चहाच्या मळ्यानं वेढलेल्या  रस्त्यातून प्रवास करत आपण सनतानीला पोहोचतो व एकदा पोहचलो की ही जागा सोडून कुठेच जाऊ नये असे वाटणे साहजिकच आहे. सनतानीमध्ये चेक-इन करताच आपल्या रुममध्ये जाण्याआधी आम्ही इथल्या रेस्टॉरंटला भेट दिली. रेस्टॉरंटबाहेर एखाद्या मंदिराबाहेर लागतात त्याप्रमाणे ओळीत चपला मांडल्या होत्या. माझ्या चेहर्‍यावर प्रश्‍नचिन्ह बघताच रीसॉर्ट मॅनेजर महेशने हे एक अनवाणी रेस्टाँरंट असल्याचे सांगितले आणि आम्ही सुद्धा चपला काढून मंदिरात पाऊल ठेवतोय या भावनेने आत गेलो. खरंच हे रेस्टॉरंट एखाद्या मंदिरापेक्षा कमी नव्हते. आम्ही तर त्याला प्रेमाने फूड टेम्पल म्हणून संबोधू लागलो. इथे कुठलाच छापलेला मेन्यू कार्ड नव्हता. तर वैयक्तिक आवडी-निवडी लक्षात घेऊन गोरमे  वेलनेस क्युजिनचा अनुभव इथे घेता येतो. प्रोटीनरीज्, आयुर्वेदिक व डिटॉक्सिफिकेशनसाठी जे काही आपल्याला हवे ते कॉन्टिनेंटल आयुर्वेदिक किंवा श्रीलंकन व्हेज-नॉन व्हेज जेवणाबरोबर वाईन्स व हेल्थ ज्युसेस् असे सर्व काही अगदी टोटली कस्टमाईज्ड मील्स सनतानीमध्ये सर्व्ह केले जात असे. चवीत काहीच कमी न पडता अतिशय उत्कृष्ट व संतुलित हेल्दी जेवणानी आपल्या शरीराचं व आत्म्याचं पोषण करण्याचा हेतू इथे पूर्ण होतो. त्यात काचेच्या व लाकडाच्या बांधकामामुळे कुठेही बसलो तरी रेनफॉरेस्ट किंवा चहाच्या मळ्यांचे दर्शन होतच असते आणि खर्‍या अर्थाने आपण निसर्गाशी एकरूप आहोत ह्याची जाणीव होते. इथल्या रूम्स सुद्धा जणू जंगलात तरंगताहेत असे वाटते. डोंगराच्या उतारावर हिल्सवर उंचावर बांधलेल्या प्रत्येक रुमची बाल्कनी समोरच्या रेनफॉरेस्टच्या बदलत्या रंगाची झलक देत असते. इथे ऊन-पावसाचा खेळ सुरू असताना समोरच्या व्हॅलीमधून खालून वर येणार्‍या ढगांना बघून हे above the clouds आपण राहतोय असा भन्नाट फील येत होता. सनतानी मधल्या स्पामध्ये वेस्टर्न व अर्थातच आयुर्वेदिक ट्रीटमेंटस् ,हीटेड ओपन-एअर थर्मल सॉल्ट पॉड व इतर हायड्रोथेरपी ट्रीटमेंट्स घेता येतात.

सनतानीमधले दोन रात्रीचे वास्तव्य करून तिथल्या उत्कृष्ट हाऊसकीपिंग टीमचा निरोप घेतला तेव्हापासून नको नं जाऊया, अजून एक दिवस तरी इथे स्टे करूया अशी मागणी साराची माझ्याकडे सुरू झाली. खरंतर मला सुद्धा ती जागा सोडवत नव्हती पण दक्षिणेकडचे गॉल आमची वाट बघत होते. थेट रूमपासून बीचवर चालत जाता येईल अशा रुममध्ये चेक-इन करताच आम्ही गॉल व उनावाटुना बीचेसच्या पांढर्‍याशुभ्र वाळूवर आपटणार्‍या लाटांमध्ये डुंबायला गेलो. इथले पाणी खरंच किती निळे आणि स्वच्छ आहे ह्याचं कौतुक करत समुद्रात व त्यानंतर स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त पोहण्याचा आनंद घेतल्यानंतर जवळच्या गॉल शहराची सैर करायला आम्ही निघालो. डच, पोर्तुगीज व इंग्लिश कलोनियल आर्किटेक्चरने सजलेल्या छोट्याशा पण चार्मिंग गॉलनंही आम्हाला चकित करून सोडलं.

गॉलवरून कोलोंबोकडे जाताना वाटेत बेंटोटामध्ये थांबून वॉटरस्पोर्टस्चा आनंद घ्यायचा आम्ही ठरवलं. आणि ज्या गोष्टीमुळे ही ट्रिप सुरू झाली ती खरंतर श्रीलंकेचे क्रिकेट दिग्गज महेला जयवर्धने आणि कुमार संगकारा ह्यांच्या मालकीचं जगप्रसिद्दध रेस्टॉरंट मिनिस्ट्री ऑफ क्रॅब ला भेट देण्याच्या उद्देशाने. ह्या रेस्टॉरंटचं बुकिंग मिळता मिळत नाही म्हणून तर आमचं रीसॉर्ट बूक करण्याआधी आम्ही ह्या मिनिस्ट्री ऑफ क्रॅबचं बूकिंग केलं होतं. आम्हाला श्रीलंकेत भावली ती तिथल्या अतिशय प्रेमळ व हसर्‍या श्रीलंकन लोकांची हॉस्पिटॅलिटी. मग ती साध्या रेस्टॉरंटमध्ये असो किंवा लक्झरी रिसॉर्टमध्ये असो, नम्रपणे हात जोडून आयुबोवान असे सगळीकडेच स्वागत होत असे. आपल्या अप्पम सारखेच डोशाचे प्रकार असलेले हॉपर्स, ऍग हॉपर्स आणि सोबत नारळाची सामबल ही चटणी तसंच इतर श्रीलंकन करीज् आणि जेवणाने मन भरले. इथल्या किंग कोकोनटनंही तहान भागवण्याचा आनंद काही औरच. वर्षाचा शेवट असा  अतिशय सुंदर झाला आणि येत्या वर्षाच्या आपल्या ट्रॅव्हल लिस्टवर, पुन्हा एकदातरी श्रीलंकेला वीकेन्ड ब्रेक  घेऊया या विचाराने आमच्या हॉलिडेची सांगता झाली. आपणही या नवीन वर्षात श्रीलंकेसारख्या आपल्या जवळच्या, ओळखीच्या  डेस्टिनेशनला नव्या दृष्टिकोनातनं पहायला एकदा नक्कीच जाऊन या… Happy New Year! आयुबोवान!

Marathi

Leave a Comment

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही.

*