Blog

तपासा आपला व्हिसा

परदेश सहलीला जायचं म्हटल्यावर सर्वात आधी आठवतो तो व्हिसा.पूर्वीच्याकाळी मुलीचा कार्यक्रम झाल्यानंतर मुलाकडच्यांचा `होकार’येईल ना ? या काळजीनं जशी वधूपित्यांची झोप उडायची तशी हल्ली यु.एस.ए. किंवा यु.के.ला जाणाऱ्यांची `व्हिसा’मिळेला ना? या काळजीने उडते.हा व्हिसा म्हणजे नेमकं काय तर ज्या देशाला तुम्ही भेट देणार आहात,त्यादेशाने प्रवेशासाठी दिलेलं परवानगी पत्र. व्हिसा – VISA याचा एक अर्थ ‘ व्हिजिटर्स इंटेडेड टू स्टे अब्रॉड’ अर्थात परदेशी जाऊन राहाणारे पर्यटक असाही सांगितला जातो.आता एखाद्या देशाकडे तुम्ही ‘ त्या देशात येण्यासाठी परवानगी’मागीतल्यावर,तुम्ही नक्की कशासाठी येताय?तुमच्या बरोबर कोण आहे?तुमच्या मायदेशात तुम्ही काय करता?तुमचा या देशात स्थाईक वगैरे होण्याचा विचार तर नाही ना ? अशी चौकशी होणं स्वाभाविकच आहे.या चौकशीची समाधानकारक उत्तरे मिळाली की त्या देशाचा व्हिसा मिळायला काही अडचण येत नाही.आता यु.एस.ए. किंवा यु.के.सारख्या देशांमध्ये नोकरी,व्यवसायाची संधी शोधणारे लोक जरा जास्तच असल्याने,हे देश व्हिसा देण्याच्या बाबतीत सर्वात काटेकोर मानले जातात.पण जेंव्हा तुम्ही केवळ पर्यटक म्हणून काही दिवसांपुरते एखाद्या देशाला भेट देणार असता,तेंव्हा व्हिसा मिळवणे फारसे कठिण नसते.मात्र हा सगळा कारभार त्या त्या देशाच्या शासनाकडून अर्थात सरकारी खात्याकडून चालत असल्याने,इथे काही वेळा सरकारी खाक्य़ा अनुभवायला मिळू शकतो.म्हणजे एकाच कुटुंबातील सगळ्या व्यक्तिंनी व्हिसासाठी अर्ज केल्यावर कधी कधी फक्त मुलांना व्हिसा मिळतो,पण पालकांचा नाकारला जातो असं होऊ शकतं.अशा वेळी काय करायचं तर फेर अर्ज करायचा आणि पुन्हा एकदा व्हिसाची सगळी प्रक्रिया पूर्ण करायची.बरं हा व्हिसा देणं किंवा नाकारणं हे सर्वस्वी त्या त्या दूतावासावर अवलंबून असतं,तिथे कोणाचा वशिला वा ओळख उपयोगी पडत नाही. वीणा वर्ल्डच्या परदेशी सहलींचे बुकिंग करणाऱ्या पर्यटकांना आम्ही व्हिसासाठी योग्य मार्गदर्शन करतो,कोण कोणती कागदपत्रे जोडावीत,कशा प्रकारे आपला ॲप्लिकेशन सादर करावा हे सांगतो,त्यामुळे सहसा पर्यटकांना व्हिसा मिळण्यात फार अडचण येत नाही.व्हिसा मिळाल्यानंतर कोणालाही होणारा आनंद समजण्यासारखा असतो,पण या आनंदाच्या भरात काही गोष्टी तपासायला विसरू नका.तुम्हाला एखाद्या देशाचा व्हिसा मिळतो,त्याच्या वैधतेचे( व्हॅलिडिटी) दोन प्रकार असतात म्हणजे तुम्हाला मिळालेला व्हिसा पाच वर्षांसाठी व्हॅलिड असला तरी त्यात किती दिवसांच्या निवासाची परवानगी आहे हे तपासणं गरजेचं असतं. मध्यंतरी माझ्या मुलाचा- निलचा एक मित्र आणि त्याची आई भेटले होते,त्या मित्राला नुकताच सिंगापूरचा दोन वर्षांचा व्हिसा मिळाला होता,त्याला त्याच्या कामासाठी सिंगापूरला वीस - पंचवीस दिवस राहावे लागणार होते,दोन वर्षांचा व्हिसा मिळाला म्हणून तो अगदी खूश होता.जेंव्हा मी त्याला विचारले की व्हॅलिडिटी दोन वर्षांची आहे पण स्टे किती दिवसांसाठी अलाउड आहे.तेंव्हा तो गडबडला,मग त्याच्या व्हिसाची डॉक्युमेंटस पाहून मी सांगितलं की काळजी करुन नकोस,तुला सलग तीस दिवसांचा स्टे एकावेळी करता येईल.प्रत्येक देशाचा व्हिसा देताना,त्यात व्हिसाची व्हॅलिडिटी आणि स्टे ची व्हॅलिडिटी दिलेली असते.तुम्हाला जेंव्हा यु.एस.ए.चा दहा वर्षांचा व्हिसा मिळतो तेंव्हा त्यात १८० दिवसांचा स्टे अलाऊड असतो.थायलंडचा व्हिसा ऑन अरायव्हल जसा मिळतो,त्याचप्रमाणे भारतातूनही करुन जाता येतो.जर तुम्ही ऑन अरायव्हल व्हिसा घेतलात तर दहा ते पंधरा दिवसांच्या स्टेची परवानगी मिळते,पण जर भारतातून व्हिसा केला असेल तर तीस दिवसांच्या स्टेची परवानगी मिळते.ही स्टेची परवानगी तुम्ही कोणत्या कॅटेगरीत अर्ज केलाय म्हणजे टूरिस्ट,स्टूडंट,फॅमिली त्यावर अवलंबून असते.तेंव्हा मंडळी व्हिसा मिळाल्याचा आनंद साजरा करताना,त्याची स्टे व्हॅलिडीटी तपासायला विसरू नका.Sudhir Patil
(Director - Veena World)