Blog

परदेशातली पैशांची काळजी


सुमारे वीस बावीस वर्षांपूर्वीची गोष्ट,तेंव्हा मी जपानला पहिल्यांदाच गेलो होतो.कुठल्याही परदेशात जाताना मी नेहमी स्वतःबरोबर जे परकीय चलन ठेवतो ते दोन प्रकारातलं असतं,म्हणजे काही भाग अमेरिकन डॉलर्स किंवा युरोमध्ये आणि काही भाग त्या देशाच्या स्थानिक चलनामध्ये.त्याप्रमाणे जपानला जातानाही मी बरोबर यु.एस.डॉलर्स आणि जपानी येन अशा दोन्ही प्रकारातील चलन बरोबर ठेवलं होतं.तिथल्या एका रेस्टॉरंटमध्ये आम्ही जेवायला गेलो,पदार्थ छान होते,सर्व्हिस चांगली होती.मी बील देताना टिप म्हणून १०० येन्सची नोट दिली.माझी टिप पाहून त्या रेस्टॉरंटचा स्टाफ चांगलाच प्रभावीत झाला.मी तिथून निघेपर्यंत सतत कोणी ना कोणी मला सर्व्हिस देण्यासाठी धडपडत होतं. अगदी मला दारापर्यंत सोडायला आले. मला त्या सुपर पोलाईट सर्व्हिसचा अर्थ कळेना.तिथून निघाल्यानंतर कारमध्ये मी कशाला तरी माझे पैशांचे पाकीट काढले आणि ते बघताना लक्षात आले की मी जपानी येन आणि अमेरिकन डॉलर्सच्या नोटा एकाच कप्प्य़ात ठेवल्या होत्या आणि त्यांच्या रंगसाधर्म्यामुळे चुकुन १०० येन ऐवजी मी १०० डॉलर्सची टीप दिली होती.आजचा डॉलर येनचा भाव बघितला तर शंभर डॉलरम्हणजे जवळ जवळ बारा हजार येन होतात.तेंव्हाही येनची किंमत अशीच होती.मी काय घोटाळा केला हे लक्षात आल्यावर त्या ‘सुपर सर्व्हिस’चं कोडं उलगडलं.खिशाला लागलेल्या कात्रीने मला एक मोठा धडा शिकवला होता,परदेश प्रवासात कधीही वेगवेगळ्या करन्सीज एकत्र ठेवू नका.अनेकदा गडबडीत किंवा निष्काळजीपणे आपण असं करतो,म्हणजे थायलंडला गेल्यावर डॉलर्स आणि थाइ बाथ एकत्र ठेवतो किंवा सिंगापूरला गेल्यावर अमेरिकन डॉलर्स आणि सिंगापूरी डॉलर्स एकत्र ठेवतो.पण असं करण्यात आपलंच नुकसान व्हायची शक्यता जास्त असते.कधी रंगसंगतीमुळे,कधी गडबडीत लक्षात न आल्यामुळे चुकीचे चलन जायची भिती असते.त्यामुळे कधीही एकाच पाकिटात दोन वेगवेगळ्या चलनातल्या नोटा एकत्र ठेवू नयेत.खरेदी करताना विक्रेत्याने कितीही घाई केली तरी नीट तपासून मगच पैसे द्यावेत-घ्यावेत.

परदेशात फिरायला गेल्यावर अनेकदा बरोबरचे पैसे नीट राहावेत म्हणून कुटुंबातील कुणाएकाकडेच( बहुतेकवेळा महिला) ठेवायला दिले जातात.मुलांना पैसे सांभाळता येणार नाहीत किंवा ज्येष्ठ बरोबर असतील तर त्यांना कशाला लागतील पैसे? म्हणून त्यांच्याकडे थोडे सुध्दा पैसे दिले जात नाहीत.पण असे करु नये.सगळे पैसे एकाच पर्समध्ये,पाकिटात किंवा एकाच व्यक्तिजवळ असतील आणि दुर्दैवाने त्याच व्यक्तिचे पाकिट मारले गेले तर एकाच फटक्यात सगळे पैसे गमवावे लागतील.त्याचप्रमाणे स्थल दर्शन करताना,शॉपिंग करताना ग्रुपशी चुकामुक झाली आणि आपण कुठेतरी रस्ता चुकलो,एकटे पडलो तर अशा इमर्जन्सीच्यावेळी किमान फोन करण्यापुरते तरी पैसे खिशात हवेतआ. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी एका टूरवर एका कुटुंबातील ज्येष्ठ व्यक्तीची चुकामुक झाली आणि ते हरवले,त्यांच्याकडे फोन करायला सुध्दा पैसे नसल्याने,त्यांना शोधणे कठिण गेले आणि महतप्रयासाने दोन दिवसांनंतर ते सापडले.अशी वेळ येऊ नये म्हणून परदेशी जातानाच कुटुंबातल्या प्रत्येक सदस्याकडे किमान काही पैसे अवश्य देऊन ठेवा आणि सहल संपेपर्यंत ते त्यांच्याकडे राहातील याची खबरदारी घ्यावी,हो इमर्जन्सी काही सांगून येत नाही.तेंव्हा परदेशात पर्यटन करताना बरोबरच्या पैशांची काळजी घ्या आणि सहलीचा आनंद वाढवा.Sudhir Patil
(Director - Veena World)