Marathi

ब्रेकफास्ट

ब्रेकफास्ट म्हणजे दिवसातले पहिले आणि सर्वात महत्त्वाचे भोजन, तर मग आपल्या हॉलिडेवरही  ब्रेकफास्टला तेवढेच महत्त्व का बरं देऊ नये? दिवसाची सुरुवात चांगली झाली की संपूर्ण दिवस छान जातो असं म्हणतात. आणि आपल्या हॉलिडेवर तर हाच पोषक ब्रेकफास्ट महत्त्वाची भूमिका बजावतो. मग  ब्रेकफास्टमध्ये शॅमपेनसोबतच हळदीच्या टेस्टी अ‍ॅन्ड हेल्दी ड्रिंक्सचा शॉटही दिवसाची सुरुवात चांगली करेल असं म्हटलं तर आश्‍चर्य नसावे.

‘उद्या सकाळी स्विमिंग कॉसच्युम घालून तयार रहा’, हॉटेल मॅनेजरने सौम्यपणे सूचना केली. बहुतेक हॉटेल्सच्या रेस्टॉरन्ट्समध्ये स्विमिंग कॉसच्युम घालून एन्ट्री नसते आणि इथे तर चक्क मला उद्या ब्रेकफास्टसाठी स्विमिंग कॉसच्युम घालून तयार राहण्याची सूचना करण्यात येत होती. दुसर्‍या दिवशी सकाळी सांगितल्याप्रमाणे मी तयार होते. मॉरिशसमधल्या त्या फाईव्ह स्टार लक्झरी हॉटेलमधली खरी लक्झरी काय होती ह्याचा अंदाज मला तेव्हा आला, जेव्हा मी ब्रेकफास्टला सुरुवात केली. इथे हा स्पेशल ब्रेकफास्ट रेस्टॉरन्टमध्ये नसून चक्क आमच्या रूमला जोडलेल्या प्रायव्हेट पूलमध्ये एका तरंगत्या बास्केटमध्ये आमची वाट पाहत होता. हॉलिडेचा खरा अर्थ जर शाळा-ऑफिसपासून सुट्टी घेऊन आराम करणे असेल तर ह्यापेक्षा स्वर्ग काय वेगळा म्हणावा. बहुतेक वेळा आपण हॉलिडेवर जातो तेव्हा कायम दोन-तीन गोष्टींपैकी आपल्या आवडीची एखादी गोष्ट निवडावी लागते. स्थलदर्शनाला निघावं की समुद्रात पोहत बसावं? समुद्रात पोहत बसावं की हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पडून रहावं? ब्रेकफास्ट करणे आवश्यक आहे, पण त्यासाठी झोप मोडून हॉटेलवर सुद्धा लवकर उठायचे का? मग स्विमिंग पूलमध्ये तासनतास पोहायचे कधी?… अशा हॉलिडेवर पडणार्‍या अनेक प्रश्‍नांवर शांती मॉरीस हे मॉरिशसमधील हॉटेल बेस्ट पर्याय. शांती मॉरीस या मॉरिशसच्या लक्झरी हॉटेलमधील ब्रेकफास्टचा अनोखा अंदाज मला यासाठीच फार आवडला. रेस्टॉरन्टच्या बुफेमध्ये हातात प्लेट धरून वाट बघण्यापेक्षा इथे स्विमिंग पूलमध्ये आराम करत पहुडण्याचा आणि सोबत चविष्ट ब्रेकफास्टची मजा लुटण्याचा हा एक्सक्लुसिव्ह अनुभव कधीच न विसरण्यासारखा.

हॉलिडे खर्‍या अर्थानं सफल होण्याचं श्रेय ब्रेकफास्टमध्ये आहे. यासंदर्भातला अनुभव आमच्या कस्टमाईज्ड हॉलिडे डिव्हिजनतर्फे ऑस्टे्रलिया हॉलिडेवर गेलेले गेस्ट मौलिक शहा यांनी आमच्यासोबत शेअर केला, तो आवर्जून इथे नमूद करावासा वाटतो. सिडनी शहरात सिडनी हार्बर ब्रिज व ओपेरा हाऊस दररोज दिसावा अशी त्यांची इच्छा होती. अशा मोक्याच्या ठिकाणचे हॉटेल निवडून रूममधूनच हा नजारा बघत, रूममध्येच ब्रेकफास्ट करायचे त्यांनी ठरविले. आणि आपल्या लग्नाच्या पंचवीसाव्या वाढदिवशी तरी आपल्या पत्नीबरोबर किमान पंचवीस मिनिटे ब्रेकफास्टची मजा घेण्याचा आनंद सेलिब्रेट केला. पण ब्रेकफास्टचा आनंद दरवेळी ब्रेकफास्ट रूममध्येच किंवा कुठल्या खास ठिकाणीच घ्यायला हवा असं काही जरुरीचं नाही. बहुतेक हॉटेल्सचे ब्रेकफास्ट बुफे त्यांच्या व्हरायटीसाठी लोकप्रिय असतात. वेगवेगळ्या प्रकारचे अनेक ऑप्शन्स असले की प्रत्येकजण आपल्या आवडीचे पदार्थ घेऊ शकतो. फळे, सॅलड व ज्युससारख्या हेल्दी ब्रेकफास्टपासून दुपारच्या जेवणाला काट मारायची असेल तर पोटभर ब्रेकफास्ट करण्याचे सर्व पर्याय या बुफेमध्ये मिळू शकतात. मुंबईतील ‘सेंट रीजिस’ या हॉटेलच्या सेव्हन किचन्स रेस्टॉरन्टमधील ‘बुफे ब्रेकफास्ट’ची जगभरातल्या सर्वात मोठ्या बुफेमध्ये नोंद केली गेलीय. इथे अतिशय रुचकर भारतीय पदार्थांपासून वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय पदार्थांपर्यंत सर्व काही चाखायला मिळते. त्यात अनेक लाईव्ह स्टेशन्सवर डोळ्यासमोर ताजे जेवण बनत असल्याने ते अधिक चांगले लागते. ‘सेंट रीजिस’ हे भारतात पर्यटनासाठी येणार्‍या परदेशी पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहेच, पण काय हरकत आहे जर एखाद्या दिवशी घरच्या ब्रेकफास्टला दांडीं मारून आपणही आपल्याच शहरात असा ‘बुफे ब्रेकफास्ट’ घेतला तर?

आपण हॉटेल रूम बूक करताना मात्र त्यासोबत ब्रेकफास्टसुद्धा समाविष्ट आहे ना याची खात्री करून घ्या. आपल्या हॉटेलच्या वास्तव्यासाठी आपल्याला दिलेल्या हॉटेल वाऊचरवर ‘सी.पी, ए.पी, एम.ए.पी’ अशी इंग्रजीत काही शॉर्टफॉर्म लिहिलेली असतात. ही अक्षरे म्हणजे मील प्लॅनचे प्रकार व या प्रकारावरून आपल्याला कळते की आपल्या हॉटेल बुकिंगसोबत कुठले भोजन समाविष्ट आहे. आपल्या वाऊचरवर ‘सी.पी’ लिहिलेले असेल तर निश्‍चिंत रहा. ‘सी.पी म्हणजेच कॉन्टिनेन्टल प्लॅन, ज्यामध्ये ब्रेकफास्ट ठरलेलाच असतो’. ब्रेकफास्ट नसेल तर त्यापुढे, ‘इ.पी म्हणजेच युरोपीयन प्लॅन असं लिहिलेलं असतं, या प्लॅनमध्ये कुठलेच भोजन समाविष्ट नसते’. तर याउलट ‘ए.पी म्हणजेच अमेरिकन प्लॅन. यामध्ये ब्रेकफास्ट, लंच आणि डिनर तिन्ही भोजन प्रकार समाविष्ट असतात’. तसेच भारतात फिरताना सर्वात लोकप्रिय प्लॅन म्हणजे ‘एम.ए.पी- मॉडिफाईड अमेरिकन प्लॅन, यामध्ये ब्रेकफास्टसोबत दुपारचे लंच किंवा रात्रीचे डिनर यांपैकी कोणतेही एक जेवण आपण घेऊ शकतो’.

जसे हे जेवणाचे प्लॅन लक्षात घेणं महत्त्वाचं आहे, तसेच कुठल्या प्रकारचा ब्रेकफास्ट त्या हॉटेलमध्ये मिळतो हे समजणेही तितकेच गरजेचे आहे. भारतात तर पोहे, उपमा, इडली, डोसा, भाजी-पुरी व त्याचबरोबर ब्रेड-अंड्याचे प्रकार, कॉर्नफ्लेक्स आणि त्यासारखेच इतर सीरीयल प्रकार अगदी सर्व काही आपल्याला सहजच मिळते. पण परदेशी फिरताना आपल्याला काही ठिकाणी भरपूर ब्रेकफास्टचे पदार्थ दिसतात तर काहीवेळा फक्त एक ब्रेड, ज्युस, फळं इत्यादी गोष्टी मिळतात. जेव्हा हॉटेलमध्ये ‘मदर ऑफ द ब्रेकफास्ट’ म्हणून ओळखला जाणारा सर्वात हेवी असा इंग्लिश ब्रेकफास्ट दिला जातो, तेव्हा त्यामध्ये अंडी, फ्राईड ब्रेड, टोमॅटो, बेक्ड बीन्स, चिकन किंवा पोर्क मीट सॉसेज्, बेकन मशरूम, बटाटा, फळं, योगर्ट असे व यापेक्षाही जास्त पदार्थांची रेलचेल असते. तसेच अंडी, बेकन, सॉसेज, ब्रेड किंवा पॅन केक्स्, सीरीयल आणि अर्थातच चहा-कॉफी असा साधारण इंग्लिश ब्रेकफास्टसारखाच मेन्यु पण तरीही त्याच्या तुलनेत कमी व्हरायटी पहायला मिळते ती अमेरिकन ब्रेकफास्टमध्ये. आणि सर्वात कमी मेन्यु म्हणजे केवळ ब्रेड क्रोसाँट, फळं, ज्युस आणि चहा-कॉफी अशा लाइट ब्रेकफास्टला ‘कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट’म्हणतात. मोठ्या व हेवी असलेल्या इंग्लिश ब्रेकफास्टला कंटाळून युरोपीयन लोकांनी असा हलका-फुलका ब्रेकफास्ट सुरू केला. एकोणीस-वीसाव्या शतकाच्या सुरुवातीला जेव्हा युरोपीयन खंडातील लोकं अमेरिकेत मोठ्या प्रमाणात प्रवास करू लागली तेव्हा त्यांच्यासाठी हॉटेल्समधील अमेरिकन ब्रेकफास्टमध्ये थोडा बदल करून लाइट ब्रेकफास्ट तयार केला गेला आणि त्यानंतर युरोप कॉन्टिनेन्टवरच्या लोकांसाठी तयार केलेला  ब्रेकफास्ट म्हणून पुढे हा ‘कॉन्टिनेन्टल ब्रेकफास्ट’या नावानेच लोकप्रिय झाला.

जिभेची चव आणि पोटाची भूख पुरेपूर भागवणारा हा ब्रेकफास्ट आज आपण हॉटेलमध्येच काय तर हवेत उडतानासुद्धा करू शकतो बरं. यामध्ये विमानप्रवास करताना ब्रेकफास्ट समाविष्ट असतो किंवा विकत घेता येतो. तर ऑस्ट्रेलियासारख्या ठिकाणी हॉट एअर बलूनमध्ये जगाच्यावरून हवेत तरंगत फिरल्यानंतर आपण ब्रेकफास्टबरोबर शॅमपेनचे सेवन करीत दिवसाची सुरुवात करू शकता. बर्‍याच जोडप्यांमध्ये हा  ‘शॅमपेन ब्रेकफास्ट’ फार लोकप्रिय आहे. अगदी जगावेगळा ब्रेकफास्ट करायला आपण हवेतच उडायला पाहिजे असं काही नाही. थायलंडमधल्या सोनेवा किरी या इको-फ्रेन्डली लक्झरी हॉटेलमध्ये बटलरच हवेत उडत आपला ब्रेकफास्ट घेऊन येतो, आहे की नाही गम्मत. इथल्या रेनफॉरेस्टमध्ये झाडावर बांधलेल्या बांबूच्या ‘ट्री पॉड’मध्ये बसून आपण सभोवतालच्या नजार्‍याची मजा लुटत असतानाच, आपला वेटर झाडावर बांधलेल्या दोरीला टारझनसारखा लोंबकळत येऊन अगदी सराईतपणे हवेत जवळपास उडतच येऊन आपला ब्रेकफास्ट व्यवस्थित आपल्यापर्यंत आणतो.

केनियात मसाई मारामध्ये जंगल सफारीला निघाल्यावर सकाळच्या गेम ड्राईव्हला झेब्रा, जिराफ, हत्ती, वॉटर बफेलो आणि जंगलचा राजा सिंह या सर्वांना आपल्या नैसर्गिक वातावरणात पाहण्याचे थ्रिल संपत नव्हते तेवढ्यात आमचा ड्रायव्हर डंकनने नदीकाठी जीप थांबवली. तिथे नदीत हिप्पो (पाणघोडे) आंघोळ करीत खेळत होते. समोरच्या तटावर हत्ती व जिराफ स्वच्छंद फिरत होते. हे सगळे पाहून आम्ही थक्क होतोय तोपर्यंत डंकनने जीपच्या पुढच्या भागावर टेबलक्लॉथ घालून मस्त ब्रेकफास्ट लावला होता. ‘टी ऑर कॉफी मॅडम?’असं त्याने विचारल्याचं ऐकू आलं खरं पण यावर उत्तर म्हणून माझा आवाज काही केल्या फुटेना. कारण तिथे जवळच तीस एक फूटांवर सिंह महाराज रात्रीच्या शिकारावर ताव मारत बसलेले मी पाहत होते. माझ्या चेहर्‍यावरची काळजी बघून डंकनने आश्‍वासन दिले की, ‘त्याची काळजी करू नकोस. त्याचे पोट भरले आहे व भूक मिटल्यावर तो काहीच खाणार नाही, हाच जंगलचा नियम आहे’. काही वेळात मला सिंहाच्या इतक्या जवळ असण्याची जणू सवय होऊन गेली अनं हळूहळू कॉफीचीही टेस्ट जीभेला जाणवायला लागली. आणि मग जीपवर मांडलेल्या ब्रेकफास्टकडे बघत चवीसाठीच नव्हे तर भूक मिटविण्यासाठी हवे तेवढेच सेवन करावे हा जंगलचा नियम आपणही पाळायला हवा हे मनाशी ठरवित, मी निसर्गाच्या त्या चमत्काराने भारावून गेले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*